पीडितेला अंतरिम पाच लाखांची भरपाई

पीडितेला अंतरिम पाच लाखांची भरपाई

Published on

पीडितेला अंतरिम पाच लाखांची भरपाई
गोरक्षकांच्या मारहाणीत पतीच्या मृत्यूप्रकरणी सरकारची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीमुळे पती गमावलेल्या कुर्ला येथील याचिकाकर्ती पीडितेला पाच लाख रुपये अंतरिम भरपाई देण्यात येईल, अशी ग्वाही नुकतीच राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात देण्यात आली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने हा खटला जलदगती न्यायालयाकडे पाठवून प्रकरण मार्गी लावण्याचे आदेशही दिले.

हसीन पूनावाला या सामूहिक हिंसाचाराच्या प्रकरणातील खटले लवकरात लवकर निकाली निघावे, प्रत्येक जिल्ह्यात जलदगती न्यायालये स्थापन करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २०१८मध्ये दिले होते. त्या निकालाचा दाखला देऊन अफरोज अन्सारी (वय २४) या पीडितेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नाशिक येथील सत्र न्यायालयासमोर प्रलंबित खटला सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आणि खटला जलदगती न्यायालयात वर्ग करण्याचे तसेच भरपाई म्हणून एक कोटी रुपयांची मागणी तिने केली होती. या याचिकेवर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी अशा प्रकारच्या गुन्ह्यांतील पीडित व त्यांच्या कुटुंबीयांसाठी महाराष्ट्र बळी भरपाई योजना, २०१४ मध्ये सुधारणा करण्याबाबतची  जानेवारी २०२२ची अधिसूचना सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयात सादर केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सरकारने सामूहिक हिंसाचारामुळे झालेले नुकसान किंवा दुखापत असे कलम समाविष्ट केले असून, त्यानुसार १० लाख रुपये भरपाई पीडितांना देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. याचिकाकर्तीला पाच लाख रुपये अंतरिम भरपाई मंजूर झाली असून, त्यांनी बँक खाते उघडताच पैसे खात्यात हस्तांतरित होतील, तसेच खटला जलदगती न्यायालयात हस्तांतरित करण्यासाठी पावले उचलण्यात आली असून, पुढील तीन आठवड्यांत हा खटला वर्ग केला जाईल, अशी माहितीही न्यायालयाला दिली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने याचिका निकाली काढली.

काय प्रकरण?
अफरोजने २०१३मध्ये अफान अन्सारीशी विवाह केला. त्यांना आठ आणि पाच वर्षांच्या दोन मुली आहेत. याचिकेनुसार, २४ जून २०२३ रोजी अहमदनगरमध्ये ४५० किलो मांस (गोमांस खरेदी केल्याच्या संशयावरून) अफान (वय ३२) आणि त्याचा चालक नासिर कुरेशी (२४) समृद्धी एक्स्प्रेस वेने मुंबईला परतत असताना त्यांचा पाठलाग करून सुमारे १४-१५ जणांनी दोघांचे हात-पाय बांधून त्यांच्या मौल्यवान वस्तू आणि फोन हिसकावून घेतले. त्यांना लाकडी काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. रात्री पोलिस आल्यानंतर त्यांनी दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. यानंतर अफानला मृत घोषित केले. सुरुवातीला इगतपुरी दंडाधिकाऱ्यांसमोरील हा खटला नोव्हेंबर २०२३ मध्ये नाशिक सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com