१२५ मेट्रिक टन चिनी फटके जप्त
१२५ मेट्रिक टन चिनी फटाके जप्त
‘डीआरआय’ची ऑपरेशन फायर ट्रेल मोहीम
मुंबई, ता. २१ : दिवाळी आणि त्यापुढील सणांच्या निमित्ताने दरवर्षी कोट्यवधींच्या चिनी फटाक्यांची आयात होते. मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील महानगरांत या फटाक्यांची व्रिक्री केली जाते. यंदा मात्र केंद्रीय यंत्रणांसह स्थानिक पोलिसांनी चिनी फटाक्यांची तस्करी आणि विक्रीविरोधात दंड थोपटले आहेत.
विशेषतः महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) या केंद्रीय यंत्रणेने गेल्या काही आठवड्यांत न्हावा-शेवासह देशभरातील बंदरांवर उतरणाऱ्या आयात मालावर करडी नजर ठेवून ४० कोटींहून अधिक किमतीचे चिनी फटाके जप्त केले आहेत. ‘डीआरआय’ने ऑपरेशन फायर ट्रेल या सांकेतिक नावाने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत न्हावा-शेवा, कांडला आणि मुंद्रा बंदरांवर चोरट्या मार्गाने उतरलेले तब्बल १२५ मेट्रिक टन चिनी फटाके जप्त केले आहेत. डीआरआयने रविवारी (ता. १९) न्हावा-शेवा बंदरात चिनी फटाके भरलेला कंटेनर जप्त केला. त्यात ४.८२ कोटी रुपये मूल्य असलेले फटाके आढळून आले. प्रत्यक्षात हे फटाके तयार कपड्यांच्या आड (लेगिंग) भारतात आणण्यात आले होते. कंटेनरच्या दर्शनी भागात कपडे आणि त्यामागे खास तयार केलेल्या चोरकप्प्यात फटाके दडविण्यात आले होते. विशेष म्हणजे हा माल गुजरातच्या अंकलेश्वर येथे जाणार, असे भासविण्यात आले होते. दुसरीकडे मुंबई पोलिसही चिनी फटाक्यांची विक्री कुठे सुरू आहे का हे जाणून घेण्यासाठी शहरातील तमाम वितरक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांची झाडाझडती घेत आहेत. तसेच विनापरवाना फटाके विकणाऱ्या फेरीवाल्यांविरोधातही धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
व्यावसायिकांना चिनी फटाक्यांचा मोह
चिनी फटाके भारतीय फटाक्यांच्या तुलनेत स्वस्त आणि आकर्षक असतात. शिवाय या फटाक्यांच्या व्यवसायात नफा जास्त असतो. त्यामुळे चीनमधून अन्य वस्तू आयात करणाऱ्या व्यावसायिकांना फटाक्यांचा मोह आवरत नाही. भारतीय फटाक्यांचे उत्पादन सर्वोच्च न्यायालय, ‘नीरी’प्रमाणे निरनिराळ्या संस्थांनी दिलेल्या आदेश, सूचनांचे पालन करून होते. गेल्या काही वर्षांत पर्यावरणपूरक अर्थात कमी प्रदूषणकारी फटाक्यांचे (ग्रीन) उत्पादन केले जाते. ज्यात बेरियम, ॲल्युमिनियम, थर्माईटचे प्रमाण कमी असते. जेणेकरून फटाक्यांमधून कार्बनसह प्रदूषणकारी वायूंचे उत्सर्जन कमी होते. त्याउलट चिनी फटाक्यांच्या उत्पादनावर असे निर्बंध नाहीत. त्यामुळे या फटाक्यांचे प्रदूषण अधिक होते.
व्यापार धोरणानुसार निर्बंध
चिनी फटाक्यांच्या आयातीवर व्यापार धोरणानुसार निर्बंध आहेत. अशा आयातीसाठी पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव सेफ्टी ऑर्गनायझेशनची परवानगी बंधनकारक असते, शिवाय या फटाक्यांमुळे बंदरांसह देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे डीआरआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.