रेल्वेच्या रूळांवर ‘मृत्यूचा मार्ग’
रेल्वेच्या रूळांवर ‘मृत्यूचा मार्ग’
५११ कोटी खर्चूनही दरवर्षी हजार प्रवासी गमावतात जीव; आता भुयारी मार्ग उभारणीची तयारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः कोट्यवधी रुपये खर्चूनही मुंबईच्या लोकल मार्गांवरील मृत्यूंची साखळी थांबलेली नाही. ट्रेसपासिंग म्हणजेच अनधिकृतपणे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांचा प्रश्न आजही तितकाच गंभीर आहे. प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी-३) अंतर्गत तब्बल ५११ कोटी रुपयांची कामे पूर्ण केली; पण त्यातून फारसा बदल झालेला नाही. दरवर्षी सुमारे हजार प्रवासी रूळ ओलांडताना जीव गमावत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.
एमयूटीपी-३ अंतर्गत मोठ्या प्रमाणात काम झाले असून, त्यातून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांच्या घटनांमध्ये घट झाली आहे; मात्र समस्या पूर्णपणे संपलेली नाही. शून्य मृत्यू मोहिमेंतर्गत पुढील पाच वर्षांत परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे एमआरव्हीसीचे एक अधिकारी म्हणाले.
९८ टक्के काम पूर्ण, तरीही बदल नाही
एमयूटीपी-३ अंतर्गत ९८ टक्के काम पूर्ण झाले असून, त्यामध्ये २७ पादचारी पूल, दोन पादचारी पुलांचा विस्तार, दोन लिंक वे, एक होम प्लॅटफॉर्म, सबवे आणि नाहूर-मुलुंडदरम्यान कुंपण उभारणीचा समावेश आहे. हे सर्व प्रकल्प मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर राबवले गेले. तरीही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा दिसून आलेली नाही. गेल्या काही दिवसांत पुन्हा रूळ ओलांडताना मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. स्थानकांवरील गाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होत आहे.
दहा वर्षांत १५ हजार ६२६ मृत्यू
अधिकृत आकडेवारीनुसार, २०१४ ते २०२४ या दहा वर्षांत १५ हजार ६२६ प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झाला. कोरोना काळात (२०२०) हा आकडा ७३० इतका खाली आला होता; मात्र त्यानंतर दरवर्षी हजार ते बाराशे प्रवासी रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडत आहेत.
शून्य मृत्यू मोहीम
एमआरव्हीसीने आतापर्यंत ३४ ठिकाणी अपघात रोखण्यासाठी उपाय केले आहेत. आता मात्र एफओबी, आरओबी किंवा स्कायवॉकऐवजी भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सात मीटर उंचीवरील पूल चढायला प्रवासी तयार नसतात, तसेच या ठिकाणी एस्केलेटरची सुविधाही नसते. जागेअभावी अनेक ठिकाणी पूल उभारणे अवघड ठरते. त्यामुळे अडीच ते तीन मीटर उंचीचे ‘वॉटरटाईट सबवे’ उभारण्याची योजना आहे, ज्यातून प्रवासी कमी पायऱ्यांमधून सुरक्षितपणे रूळ ओलांडू शकतील.
३० ठिकाणी नवे भुयारी मार्ग
एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की मध्य रेल्वेसोबत संयुक्त सर्वेक्षण करून ३० नवीन ठिकाणे ओळखली आहेत. या भुयारी मार्गांसाठी आधुनिक डिझाईन तयार करण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. हे भुयारी मार्ग पूर्णपणे पादचारी वापरासाठी असतील आणि पाण्याच्या गळतीपासून संरक्षित असतील. प्रस्ताव लवकरच मध्य रेल्वेला सादर केला जाईल. मान्यता मिळाल्यानंतर हा प्रकल्प ‘अम्ब्रेला वर्क’ योजनेअंतर्गत राबवला जाईल.
दहा वर्षांत झालेले मृत्यू (२०१४-२०२४)
वर्ष मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे एकूण मृत्यू
2014 - 1216 - 696 - 1912
2015 - 1197- 604 - 1801
2016- 1165- 633 - 1798
2017- 1074 - 577 - 1651
2018- 1022 - 597 - 1619
2019 - 929 - 526 - 1455
2020- 471- 259 - 730
2021- 748- 366- 1114
2022 - 654- 464 - 1118
2023 -782 - 495- 1277
2024- 674 - 477- 1151
एकूण- 9932 - 5694 - 15,626
सध्याची प्रवासी संख्या
- मध्य रेल्वे : ४१ लाख
- पश्चिम रेल्वे : ३१ लाख
एमयूटीपी-३ अंतर्गत झालेले काम
- ५११ कोटी रुपयांचा खर्च
- २७ एफओबी, दोन लिंक वे, एक होम प्लॅटफॉर्म
- नाहूर-मुलुंडदरम्यान कुंपण उभारणी
- रेल्वेस्थानक पुनर्विकासात अनेक सुधारणा
- २०१४ पूर्वीही १०० कोटींपेक्षा अधिक खर्च
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

