पवईत १७ लहान मुलांचे अपहरणनाट्य

पवईत १७ लहान मुलांचे अपहरणनाट्य

Published on

पवईत १७ मुलांचे अपहरणनाट्य
शासकीय कंत्राटदार आरोपी पोलिसांच्या गोळीबारात ठार

मुंबई, ता. ३० ः यामी गौतम अभिनित ‘अ थर्सडे’ या थरारक चित्रपटाचा हुबेहूब देखावा गुरुवारी रोहित आर्या या शासकीय कंत्राटदाराने मुंबईच्या पवई भागात उभा केला. आर्याने १७ लहान मुलांसह दोन जणांना पवईतील बटरफ्लाय नर्सरीत ओलीस ठेवून धमकीवजा संदेशाचा व्हिडिओ व्हायरल केला. स्टुडिओबाहेर येत त्याने बंदुकीतून एक गोळी पोलिसांच्या दिशेने झाडली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आर्या ठार झाला. या अपहरणनाट्यात अडकलेल्या सर्व लहान मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली, असे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले. या थरारक नाट्याची आज दुपारनंतर सर्वत्र चर्चा होती.
‘दुपारी सुमारे दीडच्या सुमारास पवई पोलिसांना महावीर क्लासिक इमारतीत एका व्यक्तीने १७ मुले, एक महिला व एक नागरिक अशा १९ जणांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळाली. मुंबई पोलिसांच्या पथकाने तत्काळ बचाव मोहीम राबवून सर्व मुलांची सुरक्षित सुटका केली. या मोहिमेदरम्यान मुलांना वाचवताना संबंधित जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला,’ अशी माहिती परिमंडळ १०चे उपआयुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.
आर्या मूळचा सोलापूरचा असून पुण्यात वास्तव्यास होता. गेले काही दिवस तो चेंबूर येथे भाड्याने घर घेऊन वास्तव्य करीत होता. आपली मागणी शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी फौजदारी स्वरूपाचा कट आखून त्याने ही कृती केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. त्याच्या तावडीतून सुटका झालेल्या सर्व लहान मुलांना वैद्यकीय तपासणीसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात नेण्यात आले.
...
कंत्राटाचे पैसे मिळवण्यासाठी...
तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळात सुरू झालेली ‘माझी शाळा स्वच्छ शाळा’ या योजनेचे कंत्राट आर्याला देण्यात आले होते. त्या कंत्राटाचे दोन कोटींचे बिल प्रलंबित होते. ते मिळवण्यासाठी त्याने बराच पाठपुरावा केला. केसरकर यांच्या निवासस्थानासह पुणे येथे आमरण उपोषण केले होते. मात्र ती रक्कम न मिळाल्याने आर्या याने हे टोकाचे पाऊल उचलले, अशी चर्चा आहे. यानिमित्तासह या अपहरणनाट्यामागे अन्य काही कारण होते का, या गुन्ह्यात त्याला अन्य कोणाची साथ होती का, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.
...
असा घडला थरार...
आर्या याने दिग्दर्शक असल्याचे भासवून वेबमालिकेतील भूमिकेसाठी ऑडिशनच्या नावाखाली शहरातील निरनिराळ्या विभागांतून लहान मुलांना गोळा केले. गेल्या काही दिवसांपासून पवईतील महावीर क्लासिक या १० मजल्यांच्या इमारतीतील बटरफ्लाय नर्सरी येथे हे सारे सुरू होते. दररोज ठरल्याप्रमाणे प्रशिक्षण वर्ग सुरू होई आणि संपे. जेवणाची सुट्टीही ठरलेल्या वेळेत होत असे. गुरुवारी मात्र मधली सुट्टी झालीच नाही. त्यामुळे पालकवर्ग चिंतेत पाडला. मागोमाग आर्याने सर्व मुलांना ओलीस ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. त्यामुळे धास्तावलेल्या पालकांपैकी एकाने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. तेथून पवई पोलिसांना माहिती पोहोचली. पोलिस पथकाने खात्री केली आणि आर्याशी चर्चा, वाटाघाटी सुरू केल्या. मात्र आर्याने आपल्याकडे ज्वलनशील पदार्थांचा साठा असून, या नर्सरीला आग लावून मुलांसह स्वतःलाही जाळून घेईन, अशी धमकी दिली.
प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आसपासच्या पोलिस ठाण्यांतून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. सशस्त्र शीघ्र कृती दलाची तुकडीही तेथे इमारतीबाहेर तैनात ठेवण्यात आली. पोलिसांच्या विनंतीवरून अग्निशमन दलानेही आपला ताफा इमारतीबाहेर तैनात ठेवला. दुसरीकडे उपआयुक्त नलावडे आणि अनुभवी अधिकाऱ्यांनी आर्यासोबत वाटाघाटी सुरू ठेवल्या होत्या. लहान मुलांना सुखरूप बाहेर सोडण्याची विनंती ते करीत होते; मात्र आर्या इमारतीच्या बाहेर आला आणि त्याने पोलिसांच्या दिशेने एक गोळी झाडली. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आर्या जखमी झाला. त्याला तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले गेले; मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.
...
घटनास्थळी गर्दी
हा सर्व थरार सुरू असताना आत अडकलेल्या मुलांचे पालक, नातेवाईक आणि बघ्यांची गर्दी जमली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी ती पांगवली. आर्या जखमी होताच पालकांनी आपल्या मुलांकडे धाव घेतली. सर्व मुले सुखरूप असल्याचे पाहून पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com