सायन रुग्णालयातील अस्थिमज्जा प्रत्यारोपण सुविधेचा विस्तार

सायन रुग्णालयातील अस्थिमज्जा प्रत्यारोपण सुविधेचा विस्तार

Published on

सायन रुग्णालयातील अस्थिमज्जा प्रत्यारोपण सुविधेचा विस्तार
सहा पटीने अधिक प्रत्यारोपण शक्य; रुग्णांवर सुलभ उपचार
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ३१ : पालिकेच्या सायन रुग्णालयाच्या बालरोग विभागातील बालरोगीय रक्तविज्ञान व कर्करोग शाखेत अस्थिमज्जा प्रत्यारोपण सेवांचा विस्तार होणार आहे. लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या बालरोग विभागात विविध अत्याधुनिक उपचार सुविधा आणि विशेष विभागांची उभारणी करण्यात येत आहे. यामुळे गंभीर आजारांनी ग्रस्त बालरुग्णांना अत्याधुनिक आणि सुलभ उपचार उपलब्ध होणार आहेत.

लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयात दरवर्षी सुमारे २० अस्थिमज्जा प्रत्यारोपण केले जातात, मात्र येत्या काळात ही संख्या सहा पटीने वाढून तब्बल १२० प्रत्यारोपणांपर्यंत पोहोचणार असून, म्हणजेच प्रत्यारोपण क्षमतेत ४०० टक्क्यांची अभूतपूर्व वाढ होणार आहे. या विस्तारामुळे थॅलेसेमिया, सिकलसेल आजार, ल्यूकेमिया आणि अ‍ॅप्लास्टिक अ‍ॅनिमिया यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेवर, अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या उपचारांची संधी उपलब्ध होईल. जे उपचार आतापर्यंत अनेक कुटुंबांसाठी आर्थिकदृष्ट्या अशक्य होते, ते आवाक्‍यात येतील. लोकनेते एकनाथराव गायकवाड अर्बन हेल्थ सेंटर येथे अत्याधुनिक अस्थिमज्जा प्रत्यारोपण विभाग उभारण्यात येत असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्‍घाटन नोव्हेंबर २०२५ मध्ये होणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली, तर जानेवारी २०२६ पासून रुग्णांना या ठिकाणी उपचार घेता येतील. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय मानकांनुसार सुसज्ज असलेल्या या केंद्रात आधुनिक वैद्यकीय सुविधा, अत्याधुनिक उपकरणे आणि उच्च जोखमीच्या रुग्णांसाठी स्वतंत्र संरक्षणयुक्त वॉर्ड उपलब्ध असणार आहे. यामुळे गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी सुरक्षित, प्रभावी आणि परवडणारा उपचाराचा नवा अध्याय सुरू होईल. दरम्यान, या प्रकल्पाच्या यशस्वी उभारणीसाठी ‘वेहा फाउंडेशन’चे सहकार्य लाभले आहे. या संस्थेने १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत ही सुविधा उभारली आहे. पुढील १० वर्षांपर्यंत केंद्राच्या संचालनाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. तसेच, डॉ. नवीन खत्री आणि त्यांचा ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर येथील कुशल चमू यांनी या प्रकल्पासाठी अमूल्य तांत्रिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सहाय्य केले आहे.

..
गरजू रुग्णांना सुलभ वैद्यकीय सेवा
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी म्हणाले, अस्थिमज्जा प्रत्यारोपण सेवांचा विस्तार हा लोकमान्य टिळक रुग्णालयासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. या उपक्रमामुळे हे रुग्णालय भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील अत्याधुनिक रक्तविज्ञान व कर्करोग उपचार क्षेत्रातील अग्रणी संस्था म्हणून उदयास येत आहे. मुंबईतील वंचित, दुर्बल आणि गरजू रुग्णांना उत्कृष्ट व सुलभ वैद्यकीय सेवा पुरवणे हेच आमचे ध्येय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com