नोव्हेंबरमध्येही थंडीऐवजी पाऊस

नोव्हेंबरमध्येही थंडीऐवजी पाऊस

Published on

नोव्हेंबरमध्येही थंडीऐवजी पाऊस
दिवसभर आकाश ढगाळ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : नोव्हेंबर सुरू झाल्यावर थंडीची चाहूल लागण्याऐवजी मुंबईत पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी (ता. २) सकाळपासूनच आकाश ढगाळ होते. शहर आणि उपनगरांमध्ये अधूनमधून सरी कोसळल्या. पवई, गोरेगाव, विक्रोळी, कुलाबा अशा अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
मॉन्सून अधिकृतपणे परतला असला तरी अरबी समुद्रातील हवामान प्रणालींचा प्रभाव अजूनही जाणवत आहे. त्यामुळे नोव्हेंबर सुरू झाल्यावरही मुंबईत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. ढगाळ हवेमुळे दुपारी तापमान किंचित घटले, तर सकाळ-संध्याकाळी हलक्या गार वाऱ्याची जाणीव झाली. पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असली तरी लोकल व बससेवा सुरळीत सुरू होती. रविवारी सुट्टी असल्याने रस्त्यांवर वाहतूक तुलनेने कमी दिसली. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील २४ तासांतही आकाश ढगाळ राहून हलक्या सरींची शक्यता कायम आहे. ऑक्टोबरनंतर कोरड्या वातावरणाची सवय झालेल्या मुंबईकरांना पुन्हा एकदा छत्र्या बाहेर काढाव्या लागल्या. हवामानतज्ज्ञांच्या मते, समुद्रकिनारी वाऱ्यांचा बदल आणि उष्णतेत झालेला फरक यामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुंबईत पाऊस पडत आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
...
येथे झाली रिमझिम
पवई, घाटकोपर, विक्रोळी, कांदिवली, बोरिवली, गोरेगाव, भांडुप, शिवडी, दादर, वांद्रे, कुर्ला, दहिसर, मागाठाणे यासह ठाणे, नवी मुंबई आणि भाईंदर या भागांत अधूनमधून रिमझिम सरींची नोंद झाली.
...
कुलाब्यात २६.२ मिमीची नोंद
मुंबईत पावसाच्या हलक्या व मध्यम सरींची नोंद झाली. कुलाबा केंद्रावर २७.० अंश सेल्सिअस कमाल तापमानासह २६.२ मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ केंद्रावर २९.० अंश सेल्सिअस तापमानासह २३.८ मिमी पाऊस पडला, अशी माहिती हवामान खात्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com