पालिका शाळांमध्ये एआय आधारित शिक्षण
पालिका शाळांमध्ये एआय आधारित शिक्षण
१७५ शाळांमध्ये ‘एसटीईएम रोबोटिक्स’ संच; विद्यार्थ्यांना मिळणार रोबोटिक्स, सेन्सर आणि कोडिंगचे प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील १७५ महापालिका शाळांमध्ये ‘एसटीईएम रोबोटिक्स इनोव्हेशन’ संच देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि संगणकीय प्रोग्रामिंग यांसारख्या अत्याधुनिक विषयांचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा आहे.
या उपक्रमासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, मे. अर्थन रूट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सर्वात कमी दराने कंत्राट देण्यात आले आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत १३.४३ कोटी असून, कार्यालयीन अंदाज १४.४० कोटी रुपये इतका होता.
महापालिकेने दरात सवलत मिळवून ही रक्कम ११.३८ कोटी रुपये इतकी निश्चित केली आहे. या कंत्राटाचा कालावधी तीन वर्षांचा असेल. यात एक वर्ष प्रकल्प व दोन वर्षे देखभाल कालावधीचा समावेश आहे.
शाळांमध्ये अत्याधुनिक रोबोटिक्स किट्स येणार आहेत. प्रत्येक शाळेला देण्यात येणाऱ्या एसटीईएम रोबोटिक्स संचामध्ये संवेदक (सेन्सर्स), नियंत्रण यंत्र (कंट्रोल युनिट्स), लघु रोबोटिक मॉडेल्स, वायरिंग व प्रोग्रामिंग साहित्य तसेच शिक्षकांसाठी प्रशिक्षण संच असा संपूर्ण संच असेल. या साधनांच्या मदतीने विद्यार्थी स्वतः लघु रोबोट तयार करून त्याचे प्रोग्रामिंग शिकू शकतील.
या कामासाठी एकूण चार कंपन्यांनी निविदा दाखल केल्या होत्या. त्यात मे. अरिहंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, मे. अर्थन रूट्स प्रायव्हेट लिमिटेड, मे. लाइफलाइन सिक्युरिटी अँड सिस्टीम आणि मे. रोबोकार्ट डॉट कॉम यांचा समावेश होता. रोबोकार्ट कंपनीने अपूर्ण कागदपत्रे सादर केल्याने ती अपात्र ठरली. तांत्रिक व आर्थिक मूल्यमापनानंतर ‘अर्थन रूट्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीला सर्वाधिक गुण मिळाले आणि ती सर्वात कमी दराने पात्र ठरली. महापालिका शिक्षण विभागाच्या मते, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळेल. रोबोटिक्स आणि एसटीईएम शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पनाशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता आणि संशोधनात्मक दृष्टी विकसित होईल, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
एसटीईएम रोबोटिक्स इनोव्हेशन संच सुरू झाल्यानंतर मुंबई महापालिका शाळांमध्ये तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. या उपक्रमामुळे सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला अधिक आधुनिक, स्पर्धात्मक आणि प्रयोगशील बनविण्याच्या दिशेने महापालिकेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
शिकण्याच्या पद्धतीत गुणात्मक बदल
महापालिकेने यापूर्वी संगणक प्रयोगशाळा, लघु विज्ञान केंद्रे आणि खेळत शिकण्याची (गेमिफाइड) अनुप्रयोग प्रणाली यांसारखे आधुनिक उपक्रम राबविले आहेत. एसटीईएम रोबोटिक्स हा त्याच मालिकेतील पुढचा टप्पा ठरत असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीत गुणात्मक बदल घडणार आहे.
तंत्रज्ञानाधारित रोजगाराची तयारी
या प्रकल्पाचा भांडवली खर्च १०.६७ कोटी रुपये असून, पुढील दोन वर्षांसाठी देखभाल खर्चाची तरतूदही करण्यात आली आहे.
प्रस्ताव सध्या प्रशासकांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. महापालिकेचे अधिकारी सांगतात, की मुले केवळ पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित राहणार नाहीत, तर प्रयोग करून शिकतील. त्यामुळे भविष्यातील तंत्रज्ञानाधारित रोजगार संधींसाठी त्यांची तयारी अधिक मजबूत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

