निवासी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन
निवासी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन
डॉ. संपदा मृत्यू प्रकरण; निष्पक्ष चौकशीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : शहरासह राज्यभरातील सरकारी आणि पालिका वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून संप पुकारला आहे. फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी आवाहन केले. सरकार निष्पक्ष चौकशी करून कुटुंबाला आर्थिक मदत देत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार निवासी डॉक्टरांनी केला आहे. संप दीर्घकाळ सुरू राहिला तर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे हाल होतील.
डॉ. संपदा यांनी आत्महत्येपूर्वी हस्तलिखित सुसाईड नोट लिहिली, ज्यामध्ये एका पोलिस अधिकारी आणि त्यांच्या भाडेकरूच्या मुलाकडून गंभीर छळ होत असल्याचा आरोप केला होता. या घटनेपासून डॉक्टर दररोज मेणबत्ती पेटवून आणि काळ्या फिती बांधून डॉ. संपदा आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आपला संताप व्यक्त करीत आहेत. सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) आणि पालिका मार्ड यांनी अनिश्चित काळासाठी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी पालिकेच्या कूपर, सायन, केईएम आणि नायर रुग्णालय तसेच राज्यभरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, जे. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर सरकारी वैद्यकीय रुग्णालयांच्या परिसरात मूक निदर्शने केली तसेच रॅली काढण्यात आल्या. यामध्ये निवासी डॉक्टर, इंटर्न, वैद्यकीय विद्यार्थी आणि वरिष्ठ डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालिका मार्डचे अध्यक्ष डॉ. चिन्मय केळकर यांनी वैद्यकीय समुदायाची एकता आणि न्यायासाठी अढळ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. निवासी डॉक्टरांनी डॉ. मुंडे यांच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी स्वतंत्र विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची, कुटुंबाला पाच कोटी रुपये भरपाई आणि सरकारी नोकरी देण्याची आणि सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी तक्रार निवारण आणि मानसिक आरोग्य साहाय्य प्रणाली स्थापन करण्याची मागणी केली. कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा तसेच या मागण्या पूर्ण होईपर्यंत हा संप सुरूच राहील, असे सांगितले. वरिष्ठ डॉक्टरांनी सोमवारी ओपीडी हाताळली. रुग्णांना फारसा त्रास झाला नाही; परंतु मंगळवारपासून निवासी डॉक्टर पूर्वनियोजित शस्त्रक्रियांमध्ये सहभागी होणार नाहीत. त्यामुळे संप सुरू राहिल्यास रुग्णांच्या समस्या वाढतील.
...
प्रतिमा मलिन करू नये!
डॉ. संपदा मुंढे यांचा संशयास्पद मृत्यू असून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये. डॉ. मुंढे एकट्या कमावणाऱ्या होत्या. त्यांच्या कुटुंबीयांना मदत व्हावी आणि आरोपींना शिक्षा व्हावी, ही आमची प्रमुख मागणी असल्याचे पी. जी. सेल मॅग्मोचे अध्यक्ष डॉ. नितीन मोरे यांनी सांगितले.
...
ओपीडी निम्म्यावर
पालिकेच्या रुग्णालयांतील डॉक्टरांनी ओपीडी बंद केली. डॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणामी झाला. प्रमुख रुग्णालयातील रोजची ओपीडी ही तीन ते पाच हजार एवढी असते. आजची आकडेवारी पाहिल्यावर रुग्णालयातील ओपीडी निम्म्याहून कमी झाली असल्याचे चित्र आहे. प्रसूती, रुग्णांना दाखल करून घेणे, शव विच्छेदन आदी रुग्णसेवेवर परिणाम झाला. रुग्णसेवेवरील परिणाम मंगळवारी अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

