एसटी आगारात किरकोळ इंधन विक्रीसाठी निवीदा प्रक्रिया सुरू ,
एसटी महामंडळ २५१ ठिकाणी पेट्रोल पंप उभारणार
उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभरात स्वतःच्या जागेवर २५१ ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर इंधन पुरवठा सुरू करणार आहे. पेट्रोल आणि डिझेलबरोबरच सीएनजी व इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट असलेले रिटेल विक्री (किरकोळ विक्री) पंप सुरू
करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित बैठकीत सरनाईक बोलत होते. या वेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, आर्थिक सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. सरनाईक म्हणाले, की एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. केवळ प्रवासी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलावर अवलंबून राहणे योग्य नाही. त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. ७० वर्षांपेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांकडून इंधन विकत घेत आहे. सध्या २५१ ठिकाणी एसटीच्या स्वतःच्या जागेवर पेट्रोल पंप उभारले जाणार आहेत. याद्वारे केवळ एसटीच्या बससाठी डिझेल इंधनाचे वितरण होते. अर्थात, पेट्रोल पंप चालवणे आणि त्याचे देखभाल करण्याचा उत्तम अनुभव एसटी महामंडळाच्या पाठीशी आहे. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्य ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेल व सीएनजी या पारंपरिक इंधन विक्रीबरोबर इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट असलेले पंपांचा प्रस्ताव आहे. असे इंधन विक्री पंप हे रस्त्यालगत व व्यावसायिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यभरातील एसटी महामंडळाच्या स्वतःच्या ज्या जागा आहेत, त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून अशा २५० पेक्षा जास्त जागेवर ४० बाय ३० मीटर जागा निश्चित करण्यात येत आहेत. या ठिकाणी एसटी महामंडळाचे केवळ इंधन विक्रीच नाही तर रिटेल शॉपदेखील उभारले जाणार आहे. त्यामुळे येथे इतर व्यवसायालादेखील पूरक संधी उपलब्ध होईल. यातून एसटी महामंडळाला सार्वजनिक-खासगी भागीदारीतून चांगला महसूल मिळू शकतो.
सरनाईक पुढे म्हणाले, की खुल्या निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांबरोबर देशातील नव्हे तर जगभरातील इंधन विक्रीतील नामांकित कंपनींना एसटी महामंडळाच्या सुमारे २५० पेक्षा जास्त जागांवर व्यावसायिक तत्त्वावर समुच्चय इंधन विक्री केंद्र उभारण्यासाठी निमंत्रित करीत आहोत. जिथे एसटी महामंडळाला स्वतःच्या बससाठी इंधन भरण्याची सोय असेल, याचबरोबर सर्वसामान्य ग्राहकालादेखील किरकोळ इंधन विक्री करणे शक्य होईल. अशा पद्धतीचे ‘पेट्रो-मोटेल हब’ उभे करण्याचा मानस आहे.
------
भविष्यात व्यावसायिक इंधन विक्रीतून सर्वसामान्य ग्राहकाला विश्वासार्ह इंधन विक्री केंद्र एसटी महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध होईल, तसेच महामंडळालादेखील उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होईल.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

