आरोग्य सेवा कोलमडली! रूग्ण सेवा प्रभावित आरोग्य सेवा कोलमडली! रूग्ण सेवा प्रभावित
आरोग्यसेवा कोलमडली!
रुग्णसेवेवर परिणाम
ओपीडी २५ टक्क्यांवर; शेकडो शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणी न्याय मिळावा, या मागणीसाठी राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन तीव्र केले आहे. आंदोलकांनी सोमवारी (ता. ३) ‘ओपीडी’ सेवा बंद ठेवून निषेध व्यक्त केला होता, तर मंगळवारी आंदोलन आणखी तीव्र स्वरूपाचे झाले. त्यामुळे मुंबईतील प्रमुख सरकारी रुग्णालयांमधील रुग्णसेवेवर परिणाम झाला.
डॉक्टरांचे कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू राहिल्याने आरोग्यसेवा कोलमडली. पालिकेसह सरकारी रुग्णालयांमधील ओपीडी थेट २० ते २५ टक्क्यांपर्यंत खाली आली. शिवाय, शेकडो शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंढे यांनी २४ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली. त्यांनी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलिस अधिकाऱ्यांनी बलात्कार आणि मानसिक छळ केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा राज्यभरातील डॉक्टरांकडून निषेध करण्यात येत असून सोमवारपासून सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) आणि पालिका मार्ड यांनी अनिश्चित काळासाठी कामबंद आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे; मात्र याचा मोठा परिणाम आरोग्यसेवेवर झाला आहे. पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयामध्येही रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले. रुग्णालयात सध्या अतिआवश्यक सेवा दिल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनावर ठाम
राज्यभरात डॉक्टरांनी आंदोलन सुरू ठेवल्यामुळे आरोग्य विभागाच्या यंत्रणेवर ताण आला आहे. रुग्णसेवा बाधित होऊ नये, म्हणून पर्यायी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत; मात्र डॉक्टर आपल्या मागण्यांवर ठाम असून, फलटण येथील महिला डॉक्टरला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे केईएम मार्ड अध्यक्ष डॉ. अमर अगमे यांनी सांगितले.
प्राध्यापकांनी चालवली ओपीडी
शीव रुग्णालयात दररोज सुमारे पाच ते सहा हजार रुग्ण ओपीडीमध्ये दाखल होत असतात; मात्र निवासी डॉक्टर नसल्याने सेवेवर परिणाम झाला असून ओपीडीतील रुग्णांची संख्या एक हजारावर आल्याचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. तर दररोज ४०० पर्यंत होणाऱ्या शस्त्रक्रिया ५० ते १०० पर्यंत खाली आल्याचेही त्यांनी सांगितले; मात्र रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाला आरोग्यसेवा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
माझ्यावर डेंटल शस्त्रक्रियेसंदर्भात उपचार सुरू असून मला आज पुढील उपचारांसाठी पालिकेच्या नायर रुग्णालयाकडून बोलावण्यात आले होते; मात्र या ठिकाणी आल्यावर निवासी डॉक्टरांच्या संपामुळे शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. पुढील तारीखही सांगण्यात आली नाही.
- नरेश माळी, रुग्ण, भांडुप
देशात अशा अनेक घटना घडतात, जिथे डॉक्टरवर हल्ला होतो. अनेकदा तक्रारी दाखल होत नाहीत. डॉक्टर खूप राजकीय आणि समाजातील इतर लोकांच्या दबावाखाली काम करतात. जर महिला तिच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित नसेल तर ती काम कसे करणार आणि कोणाकडे दाद मागणार?
- डॉ. मनाली भोरे, जनरल सेक्रेटरी, केईएम मार्ड
...
‘राजावाडी’, ‘भाभा’मध्ये उपचार
उपनगरीय रुग्णालयांमध्ये मात्र परिस्थिती तुलनेने स्थिर दिसली. घाटकोपर येथील राजावाडी आणि कुर्ला भाभा रुग्णालयांमध्ये ओपीडी सेवा आणि लागून येणारी रुग्णसेवा सुरळीतपणे सुरू होती. या रुग्णालयांमध्ये आलेल्या रुग्णांना डॉक्टरांचा संप असल्याची माहिती नसल्यामुळे ते नियमित तपासणीसाठी आले होते. डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे रुग्णांची तपासणी केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
ग्रामीण भागाला सर्वाधिक फटका
ग्रामीण भागामधील शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या संपाचा मोठा परिणाम झाला. उपचारासाठी शेकडोंच्या संख्येने आलेल्या रुग्णांना उपचार न घेताच परत जाण्याची वेळ आली. शिवाय, खासगी रुग्णालयात जावे लागल्याने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

