राज्यातील विविध शहरात प्रदूषणात वाढ

राज्यातील विविध शहरात प्रदूषणात वाढ

Published on

राज्यातील प्रदूषणाची पातळी चिंताजनक
मालेगावची हवा सर्वाधिक वाईट; तातडीच्या उपाययोजनांची गरज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : राज्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये हवेतील प्रदूषणाची पातळी चिंताजनक स्तरावर पोहोचली आहे. वातावरण फाउंडेशन आणि एन्वारोकॅटलिस्ट यांनी संयुक्तपणे जारी केलेल्या अहवालात राज्यातील निम्म्याहून अधिक शहरांमध्ये सूक्ष्म धूलिकण राष्ट्रीय मर्यादेपेक्षा अधिक असून सर्वच शहरांमध्ये पीएम १० पातळी ठरावीक मानकांपेक्षा अधिक आहे.
मालेगाव हे राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले असून, तेथे पीएम २.५ची पातळी ५१, तर पीएम १०ची पातळी १०६ नोंदवली गेली. त्यानंतर मालेगावपाठोपाठ जालना, जळगाव आणि परभणी ही शहरे सर्वाधिक प्रदूषणग्रस्त ठरली. राज्यातील सर्वात कमी प्रदूषण सांगलीत नोंदवले आहे. मुंबईला स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत तब्बल ९३८.५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असला, तरी त्यातील केवळ ६१ टक्के रक्कम वापरण्यात आली. नागपूरमध्येही या निधीचा वापर अर्ध्यापेक्षाही कमी झाला आहे. उलट अमरावती, अकोला आणि सोलापूर या शहरांनी ९५ ते ९९ टक्के निधी वापरून चांगली कामगिरी केली आहे.
-----
सहा महिने परिस्थिती गंभीर
पीएम २.५ सारखे सूक्ष्म धूलिकण फुप्फुसे आणि रक्तप्रवाहात जाऊन श्वसनाचे आजार, हृदयविकार, पक्षाघात आणि अकाली मृत्यूचा धोका वाढवतात. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींवर या प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम होतो. पावसाळ्याशिवाय उर्वरित सहा महिने महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये हवा अस्वस्थ करणारी असते. धोरणांची वेळेवर अंमलबजावणी होत नसल्याने राज्यात प्रदूषण संकट वाढत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
........
मुंबईतील हवा प्रदूषित
मुंबईतील हवा ‘मध्यम ते उच्च प्रदूषण’ श्रेणीत आहे. पीएम २.५चे प्रमाण ३५, तर पीएम १०चे प्रमाण ८५ ते ९० नोंदवण्यात आले. वाहनांचा धूर, बांधकामांची धूळ आणि औद्योगिक उत्सर्जन ही प्रमुख कारणे ठरत आहेत. मुंबईत ४० हून अधिक प्रदूषण मोजणी केंद्रे असूनही प्रभावी कृती आराखडा नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
----
वायू प्रदूषण हा केवळ पर्यावरणाचा नव्हे, तर सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे. धोरणे अस्तित्वात असली तरी अंमलबजावणीत मोठी तफावत दिसते. हिवाळ्यापूर्वी ठोस पावले न उचलल्यास आरोग्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
- भगवान केसभट, संस्थापक , वातावरण फाउंडेशन
.......
‘एनसीएपी’च्या चौकटीच्या पलीकडे पाहण्याची गरज आहे. प्रदूषणाचे मूळ स्रोत ओळखून त्यावर थेट उपाय न केल्यास आगामी वर्षांत परिस्थिती अधिक बिकट होईल.
- सुनील दहिया, संस्थापक, एन्वारोकॅटलिस्ट
..........
तज्ज्ञांच्या प्रमुख शिफारशी
- राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (‘एनसीएपी’)चा विस्तार राज्यातील इतर शहरांमध्ये करावा.
- हिवाळ्यापूर्वी सर्व शहरांना हंगामी कृती आराखडा लागू करणे.
- हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रांची संख्या वाढवणे आणि कार्यक्षम देखभाल करणे.
- वाहतूक, बांधकाम, औद्योगिक आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये समन्वय साधून उत्सर्जन कमी करणे.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com