घनकचरा निविदेचे ‘गुजरात कनेक्शन’
घनकचरा निविदेचे ‘गुजरात कनेक्शन’
मनसेचा महापालिकेवर गंभीर आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबईच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या नव्या निविदा प्रक्रियेवर मनसेने गंभीर संशय व्यक्त केला आहे. महापालिकेत नगरसेवक नसल्याचा फायदा घेत अधिकारी तिजोरी लुटत आहेत, असा थेट आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला.
संदीप देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार, चार हजार कोटींच्या या निविदेची किंमत ६० टक्क्यांनी वाढवून तब्बल ६,६०० कोटींपर्यंत नेण्यात आली. त्यामागे गुजरातमधील व्यापारी-अधिकारी यांचे संगनमत असल्याचा दावा करण्यात आला आहे. देशपांडेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत खुलासा केला. टेंडरसाठी सहभागी होणाऱ्या कंपन्यांची माहिती, त्यांचे दर, कोण बाद होणार, कोण क्वालिफाय होणार हे सर्व मनसेने आधीच बॅनरद्वारे जाहीर केले होते, असे ते म्हणाले. मनसेने ज्या कंपन्यांची नावे सांगितली होती त्याच एजी एनरो, प्राइम एनरो, दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट, मेट्रो वेस्ट मॅनेजमेंट या कंपन्या टेंडर प्रक्रियेत सामील झाल्या व पात्र ठरल्या. त्यामुळे ‘कार्टेल’ रचूनच ही निविदा मिळवली असल्याचा आरोप देशपांडेंनी पुन्हा केला. यामुळे पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे माजी राज्यसभा खासदार सनी पांड्यांच्या मुलाच्या ‘दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि.’ या कंपनीला काम मिळाल्याने हे ‘गुजरात कनेक्शन’ अधिक ठळक झाल्याचा मनसेचा दावा आहे.
आयुक्तांवर राजकीय दबाव!
महापालिका निवडणुकांपूर्वी अधिकारी व व्यापारी मिळून जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. आयुक्तांवरही राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. मनसेने आयुक्तांकडे निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करीत भेटीची मागणी केली होती; मात्र आयुक्तांनी वेळ न दिल्याने मनसे आक्रमक झाली आहे. याबाबत १० दिवसांत निर्णय न घेतल्यास आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या देऊ, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

