सीएसएमटीची सुरक्षा एका मशीनवर
सीएसएमटीची सुरक्षा एका मशीनवर
टर्मिनसवर एकच स्कॅनर; हल्ल्याला प्रत्युत्तर कसे देणार?
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानमधून आलेल्या अतिरेक्यांनी मुंबईवर केलेल्या भीषण हल्ल्याला आज १७ वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलाही लक्ष्य केले गेले होते. या हल्ल्यात ५८ जणांचा मृत्यू तर शंभरहून अधिक जण जखमी झाले होते. तेव्हापासून प्रशासनाने रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढवण्याचा गाजावाजा केला. आधुनिक स्कॅनर, डोअर मेटल डिटेक्टर आणि कठोर तपासणी यंत्रणा लावल्याचे जाहीर करण्यात आले; पण या सर्व गोष्टी आज कागदावरच राहिल्याचे चित्र समोर येत आहे.
हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण होत असताना, देशातील सर्वात संवेदनशील मानल्या जाणाऱ्या सीएसएमटीवर सध्या फक्त एकच बॅग स्कॅनर शिल्लक आहे. इतर सर्व स्कॅनर बंद पडल्याने काढून टाकण्यात आले आहेत. डोअर मेटल डिटेक्टर गायब झाले. हँड मेटल डिटेक्टर उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत लाखो प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी एका ‘अधांतरी’ यंत्रणेवर आहे, हे चित्र धडकी भरवणारे आहे.
आंदोलनाने सुरक्षा व्यवस्थेचा बुरखा फाडला
काही दिवसांपूर्वी सीएसएमटीवर आंदोलनकर्त्यांनी मोटरमन लॉबीचा दरवाजा अडवून गोंधळ घातला. त्यामुळे लोकल जागीच उभ्या राहिल्याने प्रवाशांत खळबळ उडाली. लोकलमधून अडकून पडलेल्या प्रवासी रेल्वे रुळावरून चालत जात असताना एका लोकलने धडक दिली. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. एवढ्या गर्दीच्या टर्मिनसवर प्रशासनाला स्वतःच्या लॉबीचे दरवाजे सुरक्षित ठेवता आले नाहीत, मग एखादा दहशतवादी हल्ला कसा रोखला जाणार, ही भीती आता सरळपणे प्रवाशांत बोलून दाखवली जात आहे. सीएसएमटीसारख्या महत्त्वाच्या स्थानकात आंदोलन करणाऱ्या लोकांना कुणी थांबवू शकले नाही. तपासणी, लक्ष ठेवणे, प्रतिबंध कोणतीही यंत्रणा काम करताना दिसली नाही. याच कारणामुळे अनेक प्रवासी संघटनांनी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
१५ लाख प्रवासी, शून्य तपासणी
सीएसएमटी म्हटले, की सर्वप्रथम नजरेसमोर येते ती लोकलच्या प्लॅटफॉर्मवरील गर्दी. दररोज १५ ते १८ लाख प्रवासी या स्थानकातून ये-जा करतात. उपनगरीय रेल्वेतून येणारे प्रवासी, मेल-एक्स्प्रेसचे प्रवासी, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे तिकीट घेणारे नागरिक अशा लाखो लोकांची वहिवाट येथे होते. इतक्या मोठ्या संख्येतील पादचाऱ्यांचा प्रवाह पाहता, हे स्थानक आताही कोणत्याही क्षणी हल्ल्याचे सोपे लक्ष्य ठरू शकते; मात्र रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेत मात्र तीच जुनाट ढिलेपणा कायम आहे.
विदेशी पर्यटकांची गर्दी, सुरक्षा नाममात्र
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सीएसएमटीची इमारत. ही संरचना जागतिक वारसा यादीत असल्यामुळे देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक दररोज येथे भेट देतात. हेरिटेज इमारतीला पाहण्यासाठी येणाऱ्या या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे; पण सध्याच्या व्यवस्थेत त्यांच्यासाठी स्वतंत्र किंवा ठोस तपासणी व्यवस्था नाही. ही स्थिती गंभीर चिंता वाढवणारी आहे.
‘चेक करा की नका करू, तुमची मर्जी’
१. प्रवाशांना बॅग स्कॅन करण्यासाठी जबरदस्ती तर दूरच; पण विनंतीदेखील केली जात नाही.
२. प्लॅटफॉर्म ९-१० समोर असलेल्या एकमेव मशीनवर तपासणीची व्यवस्था आहे.
३. प्लॅटफॉर्म ९-१० सोडला तर इतर प्रवेशद्वारामधून प्रवासी थेट बॅगा घेऊन गाड्यांमध्ये चढतात.
४. कोणती बॅग तपासली जाते याचे कोणतेही पुरावे मिळत नाहीत.
५. आरपीएफ-जीआरपीकडील कर्मचाऱ्यांकडे हँड किंवा डोअर मेटल डिटेक्टर नाहीत.
काय म्हणते आरपीएफ?
एका जवानाने नाव न छापण्याचा अटीवर सांगितले, की एकच मशीन आहे. त्यातून लाखो बॅगा तपासणे कसे शक्य आहे, उपकरणेच नाहीत. त्यांचा आवाज असहाय्य वाटत होता.
२६/११नंतरची वचनबद्धता कोसळली
२६/११ नंतर रेल्वे प्रशासनाने देशभरातील रेल्वे स्थानकांवर कडक तपासणी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. मुंबईतील सीएसएमटी, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण यांसारख्या प्रमुख स्थानकांवर डोअर मेटल डिटेक्टर लावण्यात आले. चेक पॉइंट्स उभारण्यात आले. प्रवाशांची हँड मेटल डिटेक्टरने तपासणी केली जात होती. काही काळ ही व्यवस्था सुरूही राहिली; पण हळूहळू ही साधने बंद पडली. काही दिवसानंतर काढून टाकली गेली. दुरुस्ती, बदल किंवा नव्या खरेदीचा विषय कायम कागदावर अडकला. सुरक्षा यंत्रणेचे भकम करण्याचा प्रयत्न केले; पण ते कायम ठेवण्यासाठी हवा तेवढा खर्च आणि मानवबळ कधीच दिले गेले नाही.
घटना घडली की गवगवा; बाकीचे दिवस ढिसाळपणा
दिल्लीतील अलीकडच्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईतील रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवली. काही दिवस पोलिसांची गस्त वाढवली; पण काही दिवसांनी पुन्हा जुनेच चित्र. प्रवासी संघटनांनी स्पष्टपणे म्हटले आहे, की प्रशासनाला सुरक्षा वाढवायची असते ते फक्त घटना घडल्यावर. सामान्य दिवशी मात्र योजना, यंत्रणा आणि अंमलबजावणी सर्व काही वाऱ्यावर आहे.
उपाययोजनांबाबत रेल्वेचे म्हणणे काय?
सीएसएमटीवर दोन नवीन बॅग स्कॅनर बसवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या मशीन्स प्लॅटफॉर्म क्रमांक १८ आणि आठवर बसवली जाणार आहेत. तसेच दादर, ठाणे, कल्याण, एलटीटी, पनवेल येथेही स्कॅनर बसवण्याचे आश्वासन दिले आहे; पण मशीनची घोषणाही काही वर्षांतून अनेकदा ऐकू येते. प्रत्यक्षात किती बसतात, किती दिवस चालू राहतात आणि त्यांची दुरुस्ती किती वेळात होते. याची जबाबदारी कोणीही घेत नाही.
सुरक्षा फक्त कागदावर आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत आहे. आज सीएसएमटीसह सर्व स्थानके असुरक्षितच आहेत.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
१७ वर्षांत सुरक्षा पुन्हा शून्यावर आली आहे. रेल्वे स्थानकांवर डोअर डिटेक्टर नाहीत, स्कॅन मशीन बंद आहेत. रेल्वे आंदोलन रोखण्यातही रेल्वे नापास ठरली. अशा परिस्थितीत अतिरेक्यांना थांबवण्याची क्षमता आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
- लता अरगडे,
अध्यक्षा, उपनगरीय प्रवासी महासंघ
सीएसएमटीसह मुंबईतील इतर प्रमुख स्थानकांवर नवीन बॅग स्कॅनर मशीन्स बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. खरेदी पूर्ण झाली असून लवकरच अतिरिक्त स्कॅनर कार्यान्वित केले जातील, ज्यामुळे तपासणी अधिक मजबूत होईल.
- डॉ. स्वप्नील निला,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

