एसटी फलाटवर उभी पण इंजिन चालू!
एसटी फलाटावर उभी, पण इंजिन चालू!
एसटी महामंडळाची दोन दिवस विशेष तपासणी; मुंबई विभागात ११ बस आढळल्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : बसस्थानकावर इंजिन चालू ठेवण्याचे प्रकार पुन्हा वाढले आहेत. १७ व १८ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यभर राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत एसटी महामंडळाच्या विविध बसस्थानकांवर बस इंजिन चालू स्थितीत उभ्या ठेवण्याचे प्रकार पुन्हा एकदा आढळून आले आहेत.
कित्येक विभागांतील चालकांनी बसस्थानकात पोहोचल्यावर वाहन बंद न करता इंजिन चालू ठेवले असल्याचे निदर्शनास आले. या तपासणीत सर्वाधिक प्रकार अहिल्यानगर विभागात असून, येथे तब्बल ११७ बस इंजिनसह उभ्या आढळल्या. सांगली विभागात ९४, चंद्रपूरमध्ये ५७, सोलापूरमध्ये ५५ आणि गडचिरोलीत ३६ बस इंजिन चालू अवस्थेत होत्या. तसेच मुंबई विभागात ११, नाशिकमध्ये १९, पुण्यात १७, लातूरमध्ये २४ आणि बुलढाणा विभागात १० बस आढळल्या आहेत.
बसस्थानकावर इंजिन चालू ठेवण्यामुळे डिझेलचा अनावश्यक अपव्यय होतो आणि त्याचा थेट परिणाम केपीटीएल दरांवर तसेच विभागांच्या आर्थिक स्थितीवर होतो. पूर्वी अनेक वेळा बसेस थांबल्यानंतर इंजिन बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, तरीही त्याचे पालन होत नसल्याची माहिती मिळाल्याने वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने सर्व विभागप्रमुखांना तातडीने सूचना करून चालकांना प्रशिक्षण आणि जाणीव करून देण्याचे आदेश दिले आहेत.
कारवाई करण्याचा इशारा
वाहन बंद केल्यानंतर इंजिन सुरू न झाल्यास ती वाहने तत्काळ दुरुस्त करूनच मार्गावर सोडण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात जर असे प्रकार पुन्हा आढळले तर संबंधित चालक व अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. यामुळे इंधन बचतीसोबत पर्यावरणीय जबाबदारीचे पालनही होईल, असे सांगण्यात आले आहे.

