संविधान दिनानिमित्त बेघरांसाठी बँक बचत खाते शिबिर

संविधान दिनानिमित्त बेघरांसाठी बँक बचत खाते शिबिर

Published on

संविधान दिनानिमित्त बेघरांसाठी बँक बचत खाते शिबिर
पारधी वस्तीमध्ये ३५ नागरिकांची जनधन खाती उघडली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनीही भटके विमुक्त समाजातील नागरिकांना अनेक मूलभूत हक्क आजही पूर्णपणे मिळालेले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर संविधान दिनानिमित्त या नागरिकांना आर्थिक ओळख आणि हक्क मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई उपनगरातील चिकूवाडी, बोरिवली येथील पारधी वस्तीमध्ये ‘सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रसी’ (सीपीडी) आणि कॅनरा बँकेच्या संयुक्त विद्यमाने बँक बचत खाते नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
‘एकता चौराह’ अभ्यास वर्गात झालेल्या या शिबिरात कॅनरा बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यांना संविधान उद्देशिकेची पुस्तिका देऊन स्वागत करण्यात आले. क्षेत्रीय अधिकारी शुभम टंडन यांनी सांगितले, की उघड्यावर राहणाऱ्या बेघर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आर्थिक ओळख महत्त्वाची आहे. बँक खाते उघडल्यामुळे त्यांना बचत, विमा आणि पेन्शनसारख्या योजनांचा थेट लाभ मिळणार आहे.
कॅनरा बँकेचे महाराष्ट्र क्षेत्रीय अधिकारी शुभम टंडन, मुंबई क्षेत्रीय अधिकारी आतिश कुमार आणि त्यांच्या टीमने वस्तीमध्ये जाऊन प्रत्यक्ष ३५ नागरिकांची जनधन बँक बचत खाती उघडली. याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा विमा योजना : वार्षिक २० रुपये प्रीमियम, दोन लाखांचा अपघाती विमा; जीवन ज्योती विमा योजना : वार्षिक ४३६ रुपये प्रीमियम, दोन लाखांचा जीवन विमा या दोन्ही योजनांचेही लाभ खातेदारांना जोडण्यात आले.

बचतीचा सुरक्षित मार्ग
रस्त्यावर खेळणी, फुगे, फळे, पुस्तके विकून उपजीविका करणाऱ्या पारधी समाजातील महिलांना मिळणारे पैसे सुरक्षित ठेवण्याची कोणतीही सोय नसते. अनेकदा पैसे हरवणे वा चोरीला जाणे ही समस्या असते. आता या शिबिरामुळे बचतीचा सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला असून, जीवन विम्याचीही हमी मिळाली आहे, असे सीपीडीचे समन्वयक जगदीश पाटणकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com