तक्रारीची दखल; मात्र गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ
तक्रारीची दखल; मात्र गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ
सहाय्यक आयुक्ताविरोधातील प्रकरण चौकशीच्या फेऱ्यात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : वांद्रे येथील पुनर्विकास प्रकल्पातील गुंतवणुकीबाबत सहाय्यक आयुक्तांच्या सांगण्यावरून अनेक सरकारी अधिकाऱ्यांची ‘काळी गुंतवणूक’ जीवावर बेतलेल्या निशित पटेल (वय ५३) यांच्या तक्रारीची ‘सकाळ’च्या वृत्तमालिकेमुळे पोलिसांनी दखल घेतली; मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तीन आठवड्यांपासून हे प्रकरण चौकशीच्या गुऱ्हाळात अडकल्याचे चित्र आहे.
निशित पटेल यांनी पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे ४ नोव्हेंबरला लेखी तक्रार केली होती. त्यात महापालिकेचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक, हॉटेल व्यावसायिक आणि दोन बाउन्सरविरोधात अपहरण, धमकी देत ६० कोटींची खंडणी मागितल्याचा दावा केला होता. भारती यांनी हा अर्ज पुढील कारवाईसाठी गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाकडे पाठवला; मात्र तीन आठवड्यांहून अधिक काळ लोटला तरी पटेल यांच्या तक्रारीवरील चौकशी व तपास जबाबांपुरताच मर्यादित आहे. या प्रकरणात वरिष्ठ शासकीय अधिकारी गुंतल्याने ठोस कारवाईऐवजी चौकशीचा फार्स सुरू असल्याची चर्चा पोलिस आणि महापालिका वर्तुळात सुरू आहे.
----
तक्रारदाराकडेच सीसीटीव्हीची मागणी
गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने पटेल यांच्यासह साक्षीदार आणि तक्रारीत नमूद संशयित आरोपींचे जबाब नोंदवले. सहाय्यक आयुक्ताने मारहाणीदरम्यान केलेले चित्रीकरण आणि दुसऱ्या दिवशी पत्नीच्या मोबाईलवरून साक्षीदाराला दिलेल्या धमकीची ऑडिओ क्लिप पटेल यांनी पोलिसांकडे सुपूर्द केली. याव्यतिरिक्त अन्य पुरावे शोधण्याऐवजी पोलिसांनी पटेल यांच्याकडेच सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे.
----
सबळ पुराव्याअभावी निष्कर्ष नाही!
सबळ पुरावे किंवा स्वतंत्र साक्षीदार नसल्याने कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलो नाही, असा दावा चौकशी अधिकाऱ्याने केला. ही चौकशी केवळ अपहरण, मारहाण, धमकी, खंडणीपर्यंतच मर्यादित आहे; मात्र पुराव्यांमधील आवाज सहाय्यक आयुक्ताचाच आहे का, तथाकथित आर्थिक व्यवहारांशी संबंध नसलेली महिला पोलिस अधिकारी, हॉटेल व्यावसायिक आणि दोन बाउन्सरच्या गुन्ह्यातील सहभागाबाबत विचारणा केली असता, हा तपासाचा भाग असून तो गुन्हा नोंद झाल्यावरच उघड केला जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
---
गुन्हा नोंदवण्याबाबत साशंकता
दरम्यान, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप ऐकल्यास सहाय्यक आयुक्ताचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. गुन्हे शाखेने आजवर अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांचा उलगडा केला, मात्र या प्रकरणात तीन आठवड्यांनंतरही गुन्हे शाखेला तथ्यता स्पष्ट करता आलेली नाही. त्यावरून संशयित आरोपींविरोधात गुन्हा नोंद होईल का, अशी शंका पटेल यांनी उपस्थित केली. दरम्यान, पटेल यांच्या शंकेबाबत पोलिस आयुक्त भारती यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. तसेच संशयित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण अधिकारी, महिला पोलिस अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.
---
एसीबीकडे तक्रार
पटेल यांनी पालिकेच्या सहाय्यक आयुक्ताच्या बेहिशोबी मालमत्तेबाबत आणि कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी लेखी तक्रार अर्जाद्वारे एसीबीकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

