कचरा वाहतूकिसाठी ३० नवीन मिनी कॉम्पॅक्टर वाहने :

कचरा वाहतूकिसाठी ३० नवीन मिनी कॉम्पॅक्टर वाहने :

Published on

कचरा वाहतुकीसाठी ३० नवीन मिनी कॉम्पॅक्टर वाहने

कचरा वहन क्षमता दुप्पट; इंधन बचतही होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात ३० नवीन मिनी कॉम्पॅक्टर वाहनांची भर पडली आहे. यापूर्वीच्या मिनी कॉम्पॅक्टरच्या तुलनेत नव्या वाहनांना एका फेरीत दुप्पट कचरा वाहून नेण्याची क्षमता आहे. ही वाहने एका सत्रात दोन फेऱ्या करणार आहेत. यामुळे मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वहन आता अधिक सुलभ होण्यासोबतच वाहतूक फेऱ्यांची संख्या कमी होऊन इंधनाची बचत होणार आहे.

मुंबईतील कचरा वहनाची मोठी प्रक्रिया लक्षात घेऊन आवश्यक सुधारणा करून अद्ययावत वाहने उपलब्ध करून देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या होत्या. याआधीच्या वाहनांमध्ये भेडसावणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून परिवहन अभियांत्रिकी विभागाने केलेल्या कल्पक सुधारणा कौतुकास्पद असल्याचे गगराणी यांनी नमूद केले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य आसनव्यवस्था, ओला व सुका कचरा यांसाठी स्वतंत्र कप्पे तसेच दीर्घकाळ टिकणाऱ्या साधनसामुग्रीचा वापर यांमुळे मिनी कॉम्पॅक्टरचे आयुष्यमान वाढण्यास मदत होणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले. या सुधारणा मुंबईच्या पर्यावरण संवर्धनासाठीदेखील उपयुक्त ठरतील, असेही त्यांनी नमूद केले.

कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये कचऱ्यातून निघणाऱ्या द्रव्यामुळे (लिचेट) धातुपत्रा सतत खराब होत असल्याचे आढळून येत होते. नव्या वाहनांमध्ये पाच मिमी जाडीच्या ‘हार्‍डॉक्स’ स्टील मटेरियलचे फ्लोरिंग वापरले आहे. परिणामी वाहनाचे आयुष्यमान वाढण्यास मदत होणार आहे. तसेच हायड्रॉलिक पद्धतीच्या क्लोजिंग प्लेट कव्हरमुळे वाहनाची मागील बाजू पूर्णपणे बंदिस्त राहून कचरा वाहतुकीचे स्वरूप सुधारले आहे.
_______

वाहनांचे रंग बदलणार
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यातील सर्व वाहनांचे रंग येत्या काळात पांढरा आणि निळा अशा रंगसंगतीत बदलण्याचा प्रशासनाचा मानस आहे. ही प्रक्रिया टप्पेनिहाय पद्धतीने पार पाडली जाईल, अशी माहिती उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी दिली.
.....
मिनी कॉम्पॅक्टरची वैशिष्ट्ये

इंजिन क्षमता : ११५ अश्वशक्ती

एकाच फेरीत कचरा वाहून नेण्याची क्षमता : पाच टन - त्यामुळे अधिक कचरा वहन शक्य

क्षमता : नऊ घनमीटर - कचरा सामावण्याची अधिक क्षमता

कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र चार आसनी व्यवस्था

कचरा वाहतूक वाहनांसाठी नवा पांढरा-निळा अशी रंगसंगती
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com