आता तत्काळ तिकिटांसाठी ओटीपीची सक्ती

आता तत्काळ तिकिटांसाठी ओटीपीची सक्ती

Published on

आता तत्काळ तिकिटासाठी ओटीपीची सक्ती

१ डिसेंबरपासून शताब्दी एक्स्प्रेसवर नवा नियम लागू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : तत्काळ रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये वाढती गर्दी आणि गैरप्रकार आटोक्यात आणण्यासाठी पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता तत्काळ तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशाच्या मोबाईलवर आलेला ओटीपी भरल्याशिवाय तिकीट जारी केले जाणार नाही. त्यामुळे तत्काळ आरक्षणाची संपूर्ण प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर होणार आहे.

हा नवा बदल १ डिसेंबर २०२५ला मध्यरात्रीपासून लागू होणार असून, सुरुवातीला तो ट्रेन क्रमांक १२००९/१२०१० मुंबई सेंट्रल-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेससाठीच राबवला जाईल. पुढील टप्प्यात इतर गाड्यांनाही ही प्रणाली लागू करण्याची शक्यता आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली. रेल्वेने स्पष्ट केले, की पीआरएस काउंटर, अधिकृत एजंट, आयआरसीटीसी वेबसाईट किंवा मोबाईल अ‍ॅप कोणतेही माध्यम वापरून तत्काळ बुकिंग करताना ओटीपी आवश्यक असणार आहे. प्रवाशाने बुकिंगवेळी दिलेल्या वैध मोबाईल क्रमांकावर सिस्टीमकडून ओटीपी पाठवला जाईल. तो योग्यरीत्या भरल्यानंतरच तिकीट जारी होईल.

---------------------
गैरव्यवहार टळणार
रेल्वेच्या मते, दलालांकडून होणारे मोठ्या प्रमाणातील तत्काळ तिकीट बुकिंग आणि त्यामुळे खऱ्या प्रवाशांना होणारा त्रास या बदलामुळे कमी होईल. रेल्वे तिकीट बुकिंगची जबाबदारी थेट प्रवाशाच्या मोबाईलशी जोडली जाणार असल्याने गैरव्यवहाराची शक्यता कमी होईल.

---------------------
रेल्वेचे प्रवाशांना आवाहन

पश्चिम रेल्वेने प्रवाशांना बुकिंग करताना स्वतःचा आणि सक्रिय मोबाईल क्रमांक देण्याचे आवाहन केले आहे अन्यथा ओटीपी न मिळाल्याने बुकिंग प्रक्रिया पूर्ण होणार नाही. नवा बदल लक्षात घेऊन प्रवाशांनी तिकीट बुकिंगपूर्वी मोबाईल हाताशी ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com