शिक्षकाला जामीन मंजूर

शिक्षकाला जामीन मंजूर

Published on

लैंगिक अत्याचारप्रकरणी
शिक्षकाला जामीन मंजूर

आराेपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे निरीक्षण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : पुण्यात अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली अटकेतील घरात खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. २७ एप्रिल २०२५ पासून आराेपी कोठडीत आहे.

घरात खासगीत शिकवणी घेणाऱ्या अर्जदाराविरोधात अल्पवयीन पीडितेला २६ एप्रिल २०२५ दरम्यान अनुचित शारीरिक स्पर्श केल्याचा आरोप पीडितेने केला हाेता. तिच्या आईने अर्जदाराविरोधात केलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याच्या तरतुदींनुसार पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता.

पुराव्यांचा आढावा घेतल्यानंतर चौकशी पूर्ण  झाली असून आरोपपत्रही दाखल झाले आहे. अर्जदाराची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. या गुन्ह्यासाठी त्याला जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा हाेऊ शकते; मात्र दीर्घकाळ तुरुंगवासाची कोणतीही आवश्यकता नाही. कठोर अटी लादून हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असे निरीक्षण न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठाने अर्जदाराला जामीन मंजूर करताना नोंदवले. खटला संपेपर्यंत पुराव्यांशी छेडछाड न करणे, साक्षीदारांशी संपर्क न साधणे आणि पीडित राहतो तिथे प्रवेश न करणे इत्यादी अटींसह  अर्जदाराला २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला.
--------
युक्तिवाद काय?
- अर्जदाराला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे. १५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर कोणताही आरोप करण्यात आलेला नाही. या कथित घटनेनंतर जवळपास एका महिन्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती अर्जदाराने न्यायालयाला दिली.
- पीडित मुलगी अर्जदारासोबत कधीही एकटी नव्हती. त्याची पत्नी घरात उपस्थित असायची आणि अन्य विद्यार्थीही अध्ययनासाठी येत असत. सरकारी वकिलांनी या संभाव्य साक्षीदारांचे जबाब नोंदवले नाहीत. शिक्षकाने मुलीला फटकारल्यानंतर सूड म्हणून एफआयआर दाखल केल्याचा दावाही अर्जदाराने जामिनाची मागणी करताना केला.
- दुसरीकडे, पीडितेचे वय आणि आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता अर्जदाराला जामीन देण्यास अतिरिक्त सरकारी वकील पी. पी. जाधव यांनी विरोध केला. आरोपीची सुटका झाली तर आरोपी साक्षीदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करू शकतो, असा युक्तिवादही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com