मुंबईत ‘एचआयव्ही’त घट
मुंबईत ‘एचआयव्ही’त घट
जागतिक एड्स दिन; उपचार पोहोचविण्यात यश
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः जागतिक एड्स दिनानिमित्त मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार शहरात नव्याने आढळणाऱ्या एचआयव्ही संसर्गाच्या प्रकरणांत सातत्याने घट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. निदान, उपचार मोठ्या प्रमाणात होत असल्याने संक्रमणाचा धोका कमी झाला असून मुंबई ‘९५-९५-९५’ जागतिक लक्ष्याच्या जवळ पोहोचत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
२०२५-२६ या वर्षात आतापर्यंत ३,०२,५७९ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १,५३८ (०.५ टक्के) रुग्ण एचआयव्हीबाधित आढळले आहेत. उपचार सेवांशी जोडण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांपर्यंत वाढले असून ९२,१५० गर्भवती महिलांची तपासणी केली असता त्यापैकी ३७ महिलांमध्ये नवीन संसर्ग आढळला आहे. २०२३-२४ मध्ये ५,१८,६०९ नागरिकांची तपासणी झाली. त्यापैकी ३,२९९ (०.६ टक्के) रुग्ण एचआयव्हीबाधित आढळले आहेत. उपचार सेवांशी जोडण्याचे प्रमाण ९५.४ टक्क्यांपर्यंत वाढले असून २,१०,७०० गर्भवती महिलांची तपासणी केली असता त्या वेळी ८४ महिलांमध्ये नवीन संसर्ग आढळला होता. २०२४-२५मध्ये ६,१४,६२७ नागरिकांची तपासणी झाली. त्यापैकी ३,०७४ (०.५ टक्के) रुग्ण एचआयव्हीबाधित आढळले आहेत. उपचार सेवांशी जोडण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांपर्यंत वाढले असून १,८१,६४४ गर्भवती महिलांची तपासणी केली असता त्या वेळी ७५ महिलांमध्ये नवीन संसर्ग आढळला होता.
...
मृत्यूंच्या संख्येतही घट
मुंबईतील एचआयव्हीमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही घट झाली असून २०२१-२२मध्ये १,२१० मृत्यूंच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये ही संख्या ९७४ आणि २०२५-२६मध्ये आतापर्यंत ४९१ इतकी आहे. या कालावधीत उपचारावर असलेल्या ३९,९२५ रुग्णांपैकी ३९,२२८ (९८ टक्के) जणांचा व्हायरल लोड नियंत्रित स्थितीमुळे संसर्ग प्रसाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे एड्स नियंत्रण संस्थेचे संचालक डॉ. विजय करंजकर यांनी सांगितले.
...
सातत्याने प्रगती
एड्स महामारी समाप्त करण्यासाठी २०३०पर्यंत ‘९५-९५-९५’ हे जागतिक लक्ष्य जाहीर करण्यात आले आहे. ताज्या स्थितीनुसार मुंबईतील अंदाजित ६२,५७१ बाधितांपैकी ५७,३८९ (९२%) जणांचे निदान झाले असून ५२,३८९ (९२%) रुग्ण (एआरटी) उपचारावर आहेत. यापैकी ३९,१७८ रुग्णांचे व्हायरल लोड नियंत्रित स्थिती असून हे प्रमाण ९८ टक्के आहे. निदान, उपचार आणि संक्रमण या तिन्ही घटकांमध्ये मुंबई सातत्याने प्रगती करीत असल्याचे अधिकृत आकडेवारीत समोर आले आहे.
...
विविध उपक्रम
उपायुक्त आरोग्य तसेच एड्स नियंत्रण (प्रोजेक्ट डायरेक्ट) शरद उघडे यांनी सांगितले, की मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था विविध उपक्रम राबवत असून यामुळे एड्सचे मृत्युदर कमी होण्यास मदत झाली. आहे ९५-९५-९५ योग्य नियोजनाने हे उद्दिष्ट आपण २०३०पर्यंत पूर्ण करू, अशी आम्हाला खात्री आहे.
...
उपक्रमाचे यश
- महिन्याला १०० कॅम्प यात पाच मोबाईल व्हॅन कार्यरत आणि ३५ एजन्सीची मदत
- अनरिच पॉप्युलेशन म्हणजे ज्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही, अशांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न
- स्पा मसाज पार्लर मायग्रेन पॉप्युलेशन इंजेक्टेबल व ड्रग्ज ॲडिक्ट असलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे
- विभागातील विभागीय नागरिक, दुकानदार, संस्थांना कार्यक्रमात सहभागी करणे
- औषधांचे सेवन करणे सोडणाऱ्या व्यक्तींना रोखणे व औषधे घेण्यासाठी प्रवृत्त करणे
- अन्य संसर्ग होऊ नये यासाठी तपासण्या करणे, संसर्ग झाला असल्यास उपचार सुरू करणे, संसर्गाची कारणे शोधणे
...
संक्रमणाचे मुख्य कारण लैंगिक संपर्क
देशात एचआयव्ही संक्रमणाची प्रमुख साखळी अद्यापही लैंगिक संपर्कातूनच होत असल्याचे राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या (नॅको) उपलब्ध नोंदी सूचित करतात. नॅकोच्या शेवटच्या संकलित माहितीनुसार, भारतातील ८० ते ९५ टक्के एचआयव्ही रुग्ण लैंगिक मार्गाने संक्रमित झाले आहेत; मात्र या आकडेवारीत अद्ययावत माहिती नसल्याने संक्रमणाच्या बदलत्या प्रवृत्तींचा स्पष्ट अंदाज मिळत नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे. एचआयव्ही नियंत्रणासाठी देशात मोठा निधी आणि स्वतंत्र योजना असूनही अद्ययावत आणि राज्यनिहाय तपशीलवार आकडेवारी प्रसारित न केल्याने पारदर्शकतेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

