वाऱ्यांचा वेग वाढल्याने प्रदूषणात घट

वाऱ्यांचा वेग वाढल्याने प्रदूषणात घट

Published on

वाऱ्यामुळे प्रदूषणात घट!
निर्देशांकात लक्षणीय सुधारणा; कारवाईचाही हातभार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांकात (एक्यूआय) २६ नोव्हेंबरपासून सातत्याने आणि मागील ४८ तासांत लक्षणीय सुधारणा नोंदवली गेल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. वाऱ्याच्या वेगात झालेली वाढ आणि बांधकाम प्रकल्पांवरील नियंत्रणात्मक कारवाईमुळे हवा गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली आहे.
महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी जारी केलेल्या २८ मुद्द्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यावर भर देण्यात आला असून, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी, शासकीय आणि अशासकीय प्रकल्पांवर ‘काम बंद’ नोटिशींसह विविध कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही ही कारवाई कडकपणे सुरू ठेवण्याचे सक्त निर्देश आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. आयुक्तांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी जारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी महापालिकेने सर्व प्रशासकीय विभागांत ९४ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके खासगी बांधकाम प्रकल्प, रस्ते व मेट्रोसारखे शासकीय प्रकल्प तसेच स्मशानभूमी, बेकरी आदी स्रोतांची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांना नोटिसा बजावत आहेत. बांधकाम स्थळांवरील एक्यूआय सेन्सर यंत्रणा कार्यरत आहेत का, याचीही प्रत्यक्ष तपासणी सुरू आहे. मुंबई बंदर प्राधिकरण परिसरात पेटवल्या जाणाऱ्या शेकोट्या थांबविण्यासाठी दिलेल्या सूचनेवरही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
...
प्रदूषकांचे विसर्जन जलद
२८ नोव्हेंबरपूर्वी वाऱ्याचा वेग ताशी ३-४ किमी इतका कमी होता आणि हवेतील आर्द्रताही जास्त होती, मात्र आता वाऱ्याचा वेग वाढून ताशी १०-१८ किमी झाला असून, त्यामुळे वातावरणातील प्रदूषकांचे विसर्जन जलद होत आहे आणि एक्यूआय सुधारत आहे.
...
आयुक्तांचे आवाहन
आयुक्त भूषण गगराणी म्हणाले, ‘‘वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बेकऱ्यांचे स्वच्छ इंधनावर रूपांतर, मिस्टिंग मशीनद्वारे धूळ नियंत्रण, रस्ते धुणे, जनजागृती मोहीम या सर्व उपाययोजना प्रभावीपणे सुरू आहेत. नागरिकांनी उघड्यावर कचरा जाळणे टाळावे आणि महापालिकेला सहकार्य करावे.’’ महापालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे सर्व बांधकाम प्रकल्पांनी काटेकोर पालन करावे आणि बेकऱ्यांनी स्वच्छ इंधनावर लवकरात लवकर परिवर्तन करावे, असेही त्यांनी आवाहन केले.
...
बांधकामांना नोटीस
मुंबई शहर व उपनगर क्षेत्रात वायुप्रदूषण नियंत्रणासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच वायुप्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याप्रकरणी महापालिकेकडून मुंबईतील ४८२ बांधकामांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. पैकी २६४ बांधकामांना कामे थांबवा नोटीस बजावण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com