पिंजोरहून पेंचपर्यंत थरारक सफर!

पिंजोरहून पेंचपर्यंत थरारक सफर!

Published on

पिंजोरहून पेंचपर्यंत थरारक सफर!
दोन ‘जटायू’ची यशोगाथा; वन्यजीवन संवर्धनाला नवी उमेद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : हरियानातील पिंजोर येथील बंदिस्त प्रजनन केंद्रात जन्मलेली दोन लाँग-बिल्ड गिधाडे (जटायू) एन १ आणि एन २४ यांची १५ महिन्यांची अचूक, थरारक वन्यजीवन सफर यंदा यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातून २०२४मध्ये मुक्त करण्यात आलेली ही दोन्ही गिधाडे आता मध्य प्रदेशातील जंगलात स्थिरावली आहेत. गिधाड संवर्धनासाठी ही घटना मोठा आशेची किरण ठरत असून, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) याबाबत माहिती दिली.
गेल्या २५ वर्षांपासून गिधाडांच्या संवर्धन, प्रजननावर कार्यरत असलेल्या बीएनएचएसने हरियाना वन खात्याच्या सहकार्याने पिंजोर येथे देशातील पहिले संवर्धन प्रजनन केंद्र उभारले आहे. याच केंद्रात २७ जानेवारी २०२०ला जन्मलेली दोन गिधाडे त्यांच्या पालकांनी वाढवली. २०२४मध्ये महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात इतर १० गिधाडांसह त्यांना जंगलात सोडण्याची तयारी सुरू झाली. बीएनएचएस आणि पेंच प्रशासनाने या गिधाडांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिल्यानंतर १० ऑगस्ट २०२४ला त्यांची जंगलात मुक्तता करण्यात आली. मुक्ततेनंतर त्यांच्या हालचालींचे सतत निरीक्षण करण्यात आले.
बीएनएचएसचे जीवशास्त्रज्ञ मनन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ततेनंतर केवळ १२ दिवसांत एन-२४ने स्वतःला जंगलातील जीवनाशी जुळवून घेत शिकारीवर यशस्वीरीत्या भोजन केले. त्यानंतर पेंच (एमएच) आणि पेंच (एमपी) परिसरातील नैसर्गिक मृत प्राण्यांवर तसेच उपलब्ध खाद्यस्रोतांवर ती नियमितपणे दिसून आली.
...
जोडी म्हणून स्थिरावतील!
मनन सिंग म्हणाले, ‘‘एन-२४ अगदी सुरुवातीला पेंच (एमपी) भागात गेली आणि छिंदवाडा तसेच बालाघाटच्या जंगलात तब्बल ५० किमीपर्यंत भ्रमंती केली. सध्या ती पेंच (एमपी) भागात स्थिरावली असून, अलीकट्टा आणि खावसा येथे नियमित रात्र निवास करीत आहे. दोन्ही गिधाडे एन-१ आणि एन-२४ अनेकदा एकत्र झाडांवर रात्री जमत असल्याचे दिसले. आता ही दोघे एक जोडी म्हणून स्थिरावतील, अशी आम्हाला आशा आहे,’’ असेही मनन सिंग यांनी सांगितले.
...
प्रेरणादायी उदाहरण!
बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे म्हणाले, की मुक्त करण्यात आलेल्या इतर गिधाडांचा मृत्यू खेदजनक आहे; परंतु एन १ आणि एन २४ यांच्या यशस्वी १५ महिन्यांच्या जिवंत प्रवासाने ‘कॅप्टिव्हली ब्रीडेड’ म्हणजेच बंदिस्त प्रजननातून वाढवलेल्या गिधाडांत जंगलात जगण्याची क्षमता असल्याचा पुरावा मिळाला आहे. रिठे यांनी पुढे सांगितले, की ही केवळ दोन गिधाडांची गोष्ट नाही. बीएनएचएसने पश्चिम बंगालमध्ये ३१, पिंजोरमध्ये २५ आणि महाराष्ट्रात २० गिधाडांची मुक्तता केली आहे. त्यापैकी अनेक गिधाडे सध्या जंगलात जिवंत आहेत आणि विजेच्या तारांपासून ते अन्नाच्या टंचाईपर्यंत अनेक संकटांवर मात करीत आहेत. गिधाड संवर्धन क्षेत्रात आशादायी पाऊल म्हणून या दोन जटायूंची कथा आता देशातील सर्व संवर्धन प्रकल्पांसाठी प्रेरणादायी उदाहरण बनत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com