तोतया आयबी अधिकाऱ्याचा साथीदार अटकेत
तोतया आयबी अधिकाऱ्याचा साथीदार अटकेत
१५ गुंतवणूकदारांची १७ कोटींना फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई, ता. १० ः गुप्तहेर खात्याचा (आयबी) अधिकारी असल्याचे भासवून सुमारे १५ व्यक्तींची १७ कोटींना फसवणूक करणाऱ्या ठगाच्या साथीदारास आर्थिक गुन्हे शाखेने कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या. प्रभाकर शेट्टी (७०) असे या आरोपीचे नाव आहे.
फसवणुकीची तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचण्याआधीच सूत्रधार रुपेश चौधरी याचा जुलै महिन्यात मृत्यू झाला होता. आर्थिक गुन्हे शाखेने मृत्यूपश्चात चौधरीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या गुन्ह्यात चौधरीची पत्नी निक्की, शेट्टीसह अन्य व्यक्तींना आरोपी करण्यात आले आहे.
शहरातील हॉटेल व्यावसायिक अस्लम कुरेशी या फसवणूक प्रकरणातील तक्रारदार आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०२३ मध्ये त्यांचा चौधरीसोबत परिचय झाला. चौधरीने आयबी अधिकारी, अशी ओळख करून दिली. पिवळ्या दिव्याची गाडी, गणवेशातील सशस्त्र अंगरक्षक, राजकीय पुढारी, शासन दरबारातील वलयांकित अधिकाऱ्यांसोबतची छायाचित्रे आणि देहबोलीमुळे कुरेशी यांना चौधरी खरेच आयबी अधिकारी असल्याबाबत विश्वास बसला.
ओळख वाढताच चौधरीने वाळकेश्र्वर, महालक्ष्मी, वरळी, दादर आणि शहरातील अन्य उच्चभ्रू परिसरातील म्हाडाअंतर्गत विकसित झालेल्या गृहसंकुलातील सदनिका स्वस्तात मिळवून देईन, असे प्रलोभन कुरेशी यांना दाखवले. त्यास भुलून कुरेशी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने कोट्यवधी रुपये गुंतवणूक म्हणून चौधरीच्या हवाली केले.
चौधरीच्या सूचनेवरून कुरेशी व अन्य गुंतवणूकदारांना भ्रमात ठेवण्याची जबाबदारी शेट्टीने पार पाडली. ठिकठिकाणी नेऊन सदनिका दाखवणे, बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवून त्यावर गुंतवणूकदारांच्या सह्या घेणे आदी कामे शेट्टीने पार पाडली, मात्र कुरेशी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येईपर्यंत चौधरीचा मृत्यू झाला होता. त्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यावर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.
पथकांकडून तपास सुरू
तपास सुरू झाल्यावर चौधरीच्या मृत्यूची बाब उघड झाली. त्यानंतर तपास पथकाने आपला मोर्चा अन्य आरोपींकडे वळवला. चौधरी मूळचा नाशिकचा आहे. त्याने गुंतवणूकदारांकडून उकळलेली रक्कम कुठे, कशी खर्च केली, याचा तपास पथकाकडून सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

