रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेणार
रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेणार
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांचे विधानसभेत आश्वासन
नागपूर, ता. १० : मुंबईमधील जुन्या इमारतींच्या ५ ते १० वर्षे रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेण्यात येईल, या प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक वाटल्यास विकसकावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.
मुंबईतील जिजामाता नगर, काळाचौकी येथील त्यांच्या पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात सदस्य अजय चौधरी यांनी लक्षवेधीद्वारे सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना देसाई बोलत होते.
मंत्री देसाई म्हणाले की, ‘जिजामाता नगर, काळाचौकी येथील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकाससंदर्भात तत्कालीन पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. त्या सूचनांनुसार विकासकामे केली नसल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. यासंदर्भात पुढील एक महिन्यात पुन्हा बैठक घेण्यात येईल. मुंबईतील अनेक वर्षे रखडलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेऊन विकसकांना अखेरची संधी देण्यात येईल. तरीही प्रकल्प मार्गी न लागल्यास विकसक बदलण्याची कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. या चर्चेत सदस्य जयंत पाटील, अजय चौधरी, मुरजी पटेल यांनी सहभाग घेतला.
..
अंधेरी सबवेसाठी उच्चस्तरीय बैठक
अंधेरीतील मोगरा नाला हा अंधेरी सबवेमधून वाहत असून, अंधेरी भुयारी मार्ग हा खोलगट भाग असल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या वारंवार उद्भवते. सध्यातरी महापालिका पंप लावून तात्पुरती व्यवस्था करते; मात्र हा कायमस्वरूपी उपाय नाही. आजूबाजूच्या वस्तीमुळे रुंदीकरण तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने पर्यायी मार्गांचा शोध घेण्यासाठी महापालिका आणि आयआयटीच्या तज्ज्ञांचा संयुक्त सल्लागार गट नेमण्यात आला असून, यासंदर्भात अधिवेशन संपताच पहिल्या आठवड्यात उच्चस्तरीय बैठक होईल, असेही आश्वासन मंत्री देसाई यांनी लक्षवेधीच्या उत्तरात दिले.
कुर्ल्यातील झोपडपट्टींसाठी केंद्राशी चर्चा
कुर्ला विभागातील साबळे नगर, संतोषी माता नगर व क्रांती नगर येथील रेल्वेच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासंदर्भात केंद्राकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही. दिल्लीमध्ये केंद्र सरकारशी संबंधित विषयांसाठी बैठकीत या प्रकल्पाचाही समावेश करून पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. विधानसभा सदस्य मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे आदींनी लक्षवेधी सूचना मांडली होती. कुर्ल्यातील ३.८७ एकर रेल्वेच्या जागेवरील १२४१ झोपड्यांचे नंबरिंग पूर्ण असून, ११८८ झोपड्यांचे बायोमेट्रिकही झाले आहे. गांधीनगर-इंदिरानगर परिसरातील पुनर्वसनासंदर्भात पात्र झोपडपट्टीधारक निकषांत बसत असतील आणि संबंधित झोपडपट्टीधारकाची माहिती लेखी स्वरूपात असल्यास पुनः सर्वेक्षणाचे निर्देश दिले जातील, असेही ते म्हणाले.
--
जुन्या इमारतींच्या निविदांची चौकशी
म्हाडाच्या जुन्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी कमी दराने निविदा भरण्याच्या प्रकारांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती मंत्री देसाई यांनी दिली. दक्षिण मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकाससंदर्भात सदस्य अमीन पटेल यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
त्यावर देसाई यांनी दक्षिण मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकाससंदर्भात म्हाडाच्या कलम ७९ अ अंतर्गत बजावलेल्या नोटिसीविरोधात उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पिटिशन दाखल करण्यात आले असून, म्हाडाची बाजू भक्कमपणे मांडण्यात येत आहे. उमरखाडी येथील ८१ इमारतींचा पुनर्विकास दोन टप्प्यात करण्यासंदर्भात व्यवहार्यता तपासण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

