वाढत्या बांधकामांमुळे मुंबईत पाणीटंचाई

वाढत्या बांधकामांमुळे मुंबईत पाणीटंचाई

Published on

वाढत्या बांधकामांमुळे मुंबईत पाणीटंचाई
सरकारची प्रथमदर्शनी कबुली; जलसंकट टाळण्यासाठी जलप्रकल्पांना गती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबईत वाढती बांधकामे आणि लोकसंख्यावाढीमुळे दररोज ३,८०० द.ल.लि.वरून ४,१०० द.ल.लि. इतका पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी नागरिकांना अद्यापही अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची कबुली राज्य सरकारने प्रथमच विधानसभेत दिली. भविष्यातील जलसंकटाला रोखण्यासाठी गारगाईसह चार मोठ्या जलप्रकल्पांची कामे सुरू असल्याची माहिती नगरविकासमंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. १०) सभागृहात दिली. हा प्रश्न आमदार सुनील प्रभू आणि दौलत दरोडा यांनी उपस्थित केला होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत १५ नोव्हेंबर रोजी ९२ टक्के जलसाठा उपलब्ध होता; मात्र शहराची सध्याची दैनंदिन पाण्याची गरज तब्बल ४,५०० ते ४,६०० द.ल.लि. इतकी वाढली असून अधिकृत अंदाजानुसार ही गरज ४,६६५ द.ल.लि. इतकी झाली आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. शहरात सुरू असलेली मोठी पायाभूत सुविधा विकासकामे आणि गृहनिर्माण बांधकामांमुळे लोकसंख्या वाढत आहे. उपलब्ध पाणीसाठ्याच्या तुलनेत ही वाढ अधिक असल्याने टोकाच्या व उंच भागांत कमी दाबाने पाणी मिळण्याच्या समस्या उद्भवतात. झडपांमध्ये बदल, नव्या पाइपलाइन आणि उंच भागांसाठी उदंचन केंद्रांमार्फत दाब वाढवण्याची कामे नियमितपणे केली जात असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईतील वाढती पाणी मागणी आणि मर्यादित उपलब्धता पाहता येत्या वर्षांत पाणीटंचाईचे आव्हान गंभीर होऊ नये, यासाठी हे प्रकल्प निर्णायक ठरणार असल्याचे सरकारच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे.

प्रमुख जलप्रकल्पांची कामे कुठपर्यंत?
- गारगाई धरण : प्राथमिक अभियांत्रिकीची कामे अंतिम टप्प्यात. मसुदा निविदा तयार करण्याचे काम सुरू
- पिंजाळ धरण : प्राथमिक अभियांत्रिकी सुरू. पर्यावरणीय परिणाम निर्धारण अभ्यासाच्या प्राथमिक मंजुरीनंतर डीपीआर तयार करण्याचे काम हाती
- दमनगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प : केंद्राच्या जलसंपदा, नदीविकास व गंगा पुनरुत्थान मंत्रालयाकडून प्रकल्पासाठी आवश्यक मान्यता आणि करार प्रक्रियेची कार्यवाही विविध स्तरांत सुरू
- निःक्षारीकरण प्रकल्प : १२ द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेच्या उन्नत तृतीय स्तराधारित जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पालिका स्तरावर गतीने सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com