श्वानांचा सव्वा लाख मुंबईकरांना चावा
श्वानांचा सव्वा लाख मुंबईकरांना चावा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत माहिती
नागपूर, ता. १२ : मुंबई महापालिकेच्या २०२४ मध्ये उपलब्ध नोंदीनुसार एकूण एक लाख २८ हजार २५२ नागरिकांना श्वानाने चावा घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. याच कालावधीत नागपूर महापालिका क्षेत्रात नऊ हजार ४२७ नागरिकांना श्वानदंश झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
भटक्या श्वानांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांसंदर्भात विधान परिषदेचे सदस्य सुनील शिंदे, वसंत खेडलवाल, संदीप जोशी आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील उत्तरात उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेने भारतीय जीव जंतू कल्याण मंडळाने (ॲनिमल वेलफेयर बोर्ड) विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार हुमन सोसायटी इंटरनॅशनल या जागतिक संस्थेमार्फत भटक्या श्वानांच्या २०१४ मधील सर्वेक्षणानुसार ९५,१७२ श्वान तसेच २०२४ मधील पुनसर्वेक्षणानुसार ९०,७५७ इतक्या श्वानांची नोंद करण्यात आल्याचे सांगितले. प्राणी प्रजनन नियंत्रण नियमावली, २०२३ अन्वये निर्गमित केलेल्या नियमानुसार भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण व लसीकरण करणे, श्वानांची वाढती संख्या मर्यादित ठेवणे, रेबीज निर्मूलन करणे, मनुष्य-कुत्रा संघर्ष टाळणे या उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी आपल्या उत्तरात दिली.
---
मुंबादेवी मंदिर परिसराचा लवकरच कायापालट
मुंबादेवी मंदिर परिसराचा विकास प्रकल्पाचा आराखडा सध्या अस्तित्वात असलेल्या आरक्षणाच्या चौकटीत राहून अंतिम करण्यात आला आहे. या प्रकल्पास मुंबई वारसा संवर्धन समितीची ‘ना-हरकत’ प्राप्त झाले असून, या विकास प्रकल्पाच्या अंदाजपत्रकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई महापालिका आयुक्त यांच्या मंजुरीने निधी उपलब्ध करून प्रकल्पाच्या कामाची ‘ई-निविदा’ काढण्याची प्रक्रिया महापालिकेच्या स्तरावर सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
---
बेस्टकडे स्वमालकीच्या केवळ २४९ बसताफा
बेस्ट उपक्रमाच्या २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत सुमारे १,११९ बसगाड्यांचे आयुर्मान संपुष्टात आल्याने त्या उपक्रमाच्या सेवेतून निष्कासित करण्यात आल्या आहेत. सद्यःस्थितीत बेस्टकडे स्वमालकीच्या २४९ बसताफा उपलब्ध असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. तसेच ३,३३७ स्वमालकीचा बसताफा राखण्याकरीता बेस्ट उपक्रमार्फत कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बेस्ट उपक्रमाने खासगी पुरवठादारांमार्फत ६,५५५ बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी २,४९२ बसगाड्या बेस्ट उपक्रमाकडे उपलब्ध झाल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात सांगितले.
---
मुंबईत केवळ ११३१ हायड्रंट कार्यरत
मुंबई शहर व उपनगरात लागणाऱ्या आगी विझविण्यासाठी लावण्यात आलेल्या एकूण १०,४७० हायड्रंट असून त्यापैकी १,१३१ हायड्रंट कार्यरत आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. तसेच महापालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत सर्व फायर हायड्रंट आवश्यकतेप्रमाणे दुरुस्ती करून नियमितपणे कार्यन्वित करण्यात येतात असेही त्यांनी स्पष्ट केले.
देवनारच्या क्षेपणभूमीवरील वीजनिर्मिती प्रकल्पाला ३० जूनची डेडलाइन
देवनार क्षेपणभूमीवरील मागील काही वर्षांपासून रखडलेल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाला ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची सुधारीत मान्यता ११ सप्टेंबर, २०२५ रोजी प्राप्त झाली असल्याची माहिती उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच हा प्रकल्प सुरू झाल्यास मागील या परिसरातील मानखुर्द, शिवाजीनगर तथा सभोवतालच्या परीसरातील नागरीकांना लाभ होणार असल्याचेही त्यांनी आपल्या उत्तरात सांगितले. विधानसभा सदस्य प्रवीण दरेकर, ॲड. निरंजन डावखरे, उमा खापरे आदींनी याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यात सदस्यांनी देवनार क्षेपणभूमीवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प हा ऑक्टोबर, २०२५ मध्ये कार्यान्वित होणार होता, परंतु महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आणखी नऊ महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यानंतर तो कधीपर्यंत कार्यान्वित होणार आहे, असा सवाल केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

