आता चुकाल तर संपाल!
आता चुकाल तर संपाल!
उद्धव ठाकरे यांची मुंबईकरांना साद; सत्ताधाऱ्यांचा ‘खात्मा’ करण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : ‘मुंबई आणि महाराष्ट्राकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहिले किंवा मराठी माणसाला तोडण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेऊनच आम्ही मैदानात उतरलो आहोत,’ अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांसाठी एल्गार पुकारला. या वेळी ‘आता चुकाल तर संपाल’ अशी साद मुंबईकर मतदारांना उद्धव ठाकरे यांनी घालतानाच भाजप आणि केंद्र सरकारवर कडाडून प्रहारही केला.
उद्धव ठाकरे यांनी युतीची घाेषणा करताना पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला भावनिक मुद्द्यांना हात घातला. ते म्हणाले, ‘संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली. १०७ हून अधिक हुतात्म्यांनी बलिदान देऊन मुंबई मिळवली आहे. आज ठाकरे बंधू एकत्र बसले आहेत. कारण आमच्या रक्तातच तो लढा आहे. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे त्या लढ्याचे सेनापती होते, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि काका श्रीकांत ठाकरे यांनी मुंबईसाठी संघर्ष केला. त्याच मुंबईवर आज पुन्हा उपरे नाचायला लागले आहेत.’
मुंबईच्या चिंधड्या उडवण्याचे मनसुबे
दिल्लीतील सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मुंबईचे लचके तोडण्याचे आणि चिंधड्या उडवण्याचे मनसुबे दिल्लीत बसलेल्या दोघांचे (मोदी-शहा) आहेत. जर अशा वेळी आम्ही भांडत बसलो तर तो हुतात्म्यांचा अपमान ठरेल. आम्ही केवळ एकत्र आलो नाही, तर एकत्र राहण्यासाठीच आलो आहोत.’
----
मराठी माणसाला भावनिक साद
विधानसभेत भाजपने दिलेल्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘भाजपने जो अपप्रचार केला त्याला बळी पडू नका. मी मराठी माणसाला सांगतोय. आता जर का चुकाल तर संपाल. आता फुटलात तर पूर्णपणे संपून जाल. म्हणून तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, हाच आमचा संदेश आहे.’
---
उद्धव ठाकरे म्हणाले...
- मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा राजकारणात खात्मा करण्याची शपथ आम्ही घेतली आहे.
- भाजपला काय हवे आहे ते त्यांनी पाहावे; पण महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय हवे आहे ते आम्ही दोघे पाहतोय.
- मराठी माणूस सहसा कुणाच्या वाटेला जात नाही, पण त्याच्या वाटेला कुणी आलं तर त्याला तो परत जाऊ देत नाही.
- आज केवळ महाराष्ट्रच नाही तर अख्खा देश आमच्याकडे बघतोय. आमची युती ही महाराष्ट्र रक्षणासाठी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

