आनंददायी शिक्षणामुळे मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती पायाभूत साक्षरतेत वाढ, भाषा, गणितात मुलांमध्ये कमालीची प्रगती

आनंददायी शिक्षणामुळे मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती पायाभूत साक्षरतेत वाढ, भाषा, गणितात मुलांमध्ये कमालीची प्रगती

Published on

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची प्रगती
गणित, भाषा विषयांमधील गुणांच्या टक्केवारीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : महापालिकेच्या बालवाडी ते चौथीपर्यंतच्या तब्बल ३१ हजार विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिका शिक्षण विभागाने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (एफएलएन) हा पथदर्शी कार्यक्रम राबवला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या गणित आणि भाषा विषयांमध्ये कमालीची प्रगती झाल्याचे शिक्षण विभागाच्या एका अहवालातून समोर आले आहे. यात प्रामुख्याने ३१ हजार विद्यार्थ्यांची गणितातील प्रगती ही ७९ टक्क्यांवरून ८२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. तर दुसरीकडे भाषाज्ञानातही अशीच मोठी भरीव प्रगती समोर आली असून यात ८२ टक्क्यांवरून ८३ टक्के प्रगती झाल्याचे दिसून आले आहे.
मुंबई महापालिकेच्या बालवाडीतील चौथीला ३१ हजार विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत पायाभूत साक्षरता हा प्रकल्प वेगळ्या पद्धतीने राबविला. यामध्ये दर शनिवारी विनादप्तर शाळा, आनंददायी शिक्षण, तसेच गणिताचे विषय समजून घेण्यासाठी चित्रमय गोष्टी, कथा यांच्यासह विविध गोष्टींचा वापर करण्यात आला. तसेच भाषेसाठी कथा, गोष्टी सांगून ते पटवून देण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता ज्ञानात प्रगती झाल्याचे दिसून आले आहे.
महापालिका शाळांतील शिक्षकांनी या प्रकल्पासाठी अमूर्त अशा प्रकारच्या विविध संकल्पनांचा वापर केला. शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात डॅशबोर्ड वापरण्यात आले. उपक्रमाच्या सुरुवातीला प्रत्येक विद्यार्थ्याच्या अगोदरच्या शैक्षणिक कामगिरीचा अभ्यास करण्यात आला. त्यात प्राथमिक स्तरावर संख्याज्ञान, भाषेसह गणितात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्ररीत्या एक महिना उपचारात्मक शिक्षणाची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्रत्येक दिवशी झालेल्या प्रगतीचा आढावा घेत कमकुवत विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देण्यात आले. त्यांची पायाभूत साक्षरता तपासताना त्यांचे भाषिक कौशल्य, वाचन, लेखन कौशल्यही विचारात घेण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.


आनंददायी शिक्षणावर भर
महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरतेसाठी प्रामुख्याने ‘आनंददायी शिक्षण’ यावर सर्वाधिक भर देण्यात आला. तसेच कृतीआधारित अध्ययन, गटचर्चा, खेळधारित उपक्रम, गोष्टींच्या माध्यमातून अध्यापन आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांना शिकण्यात आनंद मिळावा, त्यांची भीती दूर व्हावी आणि मूलभूत कौशल्ये मजबूत व्हावीत, या उद्देशाने शिक्षण विभागाने पायाभूत साक्षरतेचे हे मॉडेल प्रभावीपणे राबवले असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.


पालकांमध्ये विश्वास वाढीला
आपल्या मुलांमध्ये पायाभूत साक्षरता मोहिमेनंतर झालेली प्रगती पाहून मोठ्या प्रमाणात पालकांमध्येही महापालिका शाळांसंदर्भात विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. अनेक पालकांनी आपल्या मुलांच्या झालेल्या प्रगतीवर समाधान व्यक्त केल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले. तसेच शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्या समन्वयामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती, आत्मविश्वास आणि शिकण्यातील गती वाढली आहे. ही यशस्वी कामगिरी भविष्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पायाभरणी ठरणार असल्याचेही शिक्षणतज्ज्ञांकडून सांगण्यात आले.


ठळक मुद्दे :
- महापालिका शाळांतील ३१ हजार विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरतेत प्रगती
- गणित विषयात ७९ टक्क्यांवरून ८२ टक्क्यांपर्यंत वाढ
- भाषा विषयात ८३ टक्के कामगिरी
- आनंददायी व कृतीआधारित शिक्षणाचा सकारात्मक परिणाम
- पायाभूत साक्षरतेच्या मॉडेलमुळे पालकांच्या आत्मविश्वासात वाढ
- खेळ, गोष्टींतून अध्यापनामुळे मुलांमध्ये शिकण्याची गोडी वाढली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com