इच्छुकांची ‘एबी’ फॉर्मसाठी घालमेल!
इच्छुकांची ‘एबी’ फॉर्मसाठी घालमेल!
बंडखोरी टाळण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून सावध भूमिका
बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत, तर १७ दिवसांवर मतदान आले आहे; मात्र रविवारी (ता. २८) सुट्टी असूनही निवडणूक रिंगणात ना उत्साह, ना प्रचार, ना उमेदवार अर्ज दाखल असे सुने सुने चित्र आहे. युती-आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाही बंडखोरी रोखण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी सावध भूमिका घेत एबी फॉर्म देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची घालमेल सुरू आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेची युती जाहीर झाली असली तरी जागावाटप पूर्ण झालेले नाही. तसेच ठाकरे गटाकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी बोलणी सुरू आहे. भाजप-शिवसेना शिंदे गटाची महायुती निश्चित असून जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. युती-आघाडीच्या या वाटाघाटी सुरू असतानाच निश्चित झालेले उमेदवार जाहीर केले तर इच्छुक नाराजांची पळापळ होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक पक्ष विरोधी गटातील उमेदवार जाहीर होण्याची वाट बघत आहेत; मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन सहा दिवस उलटले तरी चित्र स्पष्ट होत नसल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक आहे. आपण इच्छुक असलेली जागा आपल्या पक्षाच्या वाट्याला येणार का, याचीच चिंता त्यांना असल्याचे हे उमेदवार खासगीत सांगत आहेत.
बंडखोरी रोखण्यासाठी व्यूहरचना
नऊ वर्षांनंतर मुंबईत महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे अनेक जण निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच गेल्या तीन वर्षांतील राज्यातील पक्ष फोडाफोडी पाहता उमेदवारांची पळवापळवी होऊ शकते, बंडखोरी होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे व्यूहरचना म्हणून कोणताही गाजावाजा न करता अखेरच्या क्षणी एबी फॉर्म देऊन उमेदवारी देण्यावर सर्वच पक्षांनी भर दिला असल्याचे एका राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.
आमचे जागावाटप अंतिम टप्प्यात असून लवकरच उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत सर्व जण उमेदवारी अर्ज भरतील; पण विरोधी गोटातून कोण उमेदवार असतील, याकडेही आमचे बारीक लक्ष असून त्यानुसार योग्य उमेदवार देण्यावर भर आहे.
- सचिन सावंत, मुख्य प्रवक्ते, काँग्रेस
शिवसेना आणि मनसेचे जागावाटपाचे काम नियोजनबद्धपणे सुरू आहे. त्यानुसार जागावाटप आणि उमेदवारीवर लवकरच शिक्कामोर्तब होणार असून मंगळवारी सर्वजण उमेदवारी अर्ज भरतील.
- हर्षल प्रधान, प्रवक्ते, शिवसेना (ठाकरे गट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

