प्रभाग क्रमांक १६६ची राजकीय गणिते बदलली

प्रभाग क्रमांक १६६ची राजकीय गणिते बदलली

Published on

प्रभाग क्रमांक १६६ची राजकीय गणिते बदलली
महायुती व शिवसेना-मनसेत थेट लढाई
मुंबई, ता. २९ ः कलिना विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या प्रभाग क्रमांक १६६ मध्ये २०१७ च्या पालिका निवडणुकीत मनसेचे उमेदवार संजय तुर्डे विजयी झाले होते, तर भाजपच्या तिकिटावर लढलेले ॲड. सुधीर खातू दुसऱ्या स्थानावर होते. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांत शिवसेनेचे झालेले दोन गट आणि राजकीय फाटाफुटीमुळे येथील चित्र पुरते बदलले आहे.
२०१७ मध्ये मनसेतून ७५६ मतांनी विजयी झालेले तुर्डे आज शिवसेना शिंदे गटात आहेत, तर दुसऱ्या स्थानावर असलेले ॲड. खातू यांनी भाजपपासून फारकत घेत शिवसेना ठाकरे गटासोबत आहेत. आता शिवसेना-मनसे युतीविरुद्ध शिवसेना-भाजप महायुती यांच्यात थेट लढत होणार असल्याने येथे कोण उमेदवार असणार, हा गड कोण सर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठी, ख्रिश्चन आणि मुस्लिमबहुल मतदार असलेल्या या प्रभागात बैल बाजार, सावरकर नगर, शेठीया नगर, अशोक नगर, मिलिंद नगर, शास्त्री नगर, संदेश नगर, क्रांती नगर या भागांचा समावेश असून, येथे सुमारे ४१ हजार ४०० एकूण मतदार आहेत. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत या प्रभागातून मनसेतून संजय तुर्डे यांना ५,९०८ मते मिळाली होती, तर भाजपचे उमेदवार ॲड. सुधीर खातू यांना ५,१५२ मते मिळाल्याने तुर्डे यांचा ५७६ मतांनी विजय झाला होता. याशिवाय सध्या भाजपमध्ये असलेल्या नितेश सिंग यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवत ४,६३२ मते घेतली होती, तर शिवसेनेच्या तत्कालीन उमेदवार मनाली तुळसकर यांना ३,७९४ मते मिळाली होती. मात्र, २०१७ नंतर राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. तेव्हा भाजपसोबत असलेले खातू आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, तुर्डे शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर आहेत.
काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार नितेश सिंग भाजपसोबत आहेत. तसेच आता शिवसेना-मनसे युती झाल्याने मागील निवडणुकीत मनसे, भाजप, शिवसेना अशी झालेली मतांची विभागणी थांबणार का, हा प्रश्न आहे.

लोकसभा, विधानसभेतील चित्र
लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला होता. त्यांना कलिना विधानसभा मतदारसंघातून ६७ हजार ६३० मते मिळाली होती, तर महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना ५१ हजार ३२८ एवढी मते मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय पोतनीस यांना ५९ हजार ८२० तर भाजपचे अमरजीत सिंग यांना ५४ लाख ८१२ मते मिळाली होती.

२०१७ मधील चित्र
- संजय तुर्डे (मनसे) - ५,९०८ मते
- ॲड. सुधीर खातू (भाजप) - ५,१५२ मते
- नितेश सिंग (काँग्रेस) - ४,६३२ मते
- मनाली तुळसकर (शिवसेना) - ३,७९४

प्रमुख समस्या
- विमानतळाजवळ असल्याने झोपड्यांच्या पुनर्विकासावर फनेल झोनमुळे मर्यादा
- मिठी नदीच्या पुरामुळे वस्त्यांमध्ये शिरणारे पाणी
- वाहतूक कोंडी
- सुसज्ज सार्वजनिक रुग्णालयाची व्यवस्था नसणे
- शौचालयांची अपुरी व्यवस्था
- भंगारची अनधिकृत गोडाऊन

Marathi News Esakal
www.esakal.com