समाजवादी पार्टीचे मुंबईत ‘एकाला चलो’
समाजवादी पार्टीचे मुंबईत ‘एकाला चलो’
उत्तर भारतीय मतदारांवर मदार
मुंबई, ता. २९ ः मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईत एकमेव आमदार असलेल्या समाजवादी पार्टीने कोणत्याही पक्षाशी तूर्तास जवळीक न साधता ‘एकाला चलो’चा नारा देत निवडणूक रिंगणात कंबर कसली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह मुंबईत अनेक बड्या नेत्यांच्या सभा, चौकसभा आयोजित केल्या जाणार असून, यंदा मागील निवडणुकीपेक्षा दुपटीने यश कसे मिळवता येईल, याचे नियोजन पक्षाने केले असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई महापालिका निवडणुकीत समाजवादी पक्षाने २०१७मध्ये मोठी ताकद अनेक मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारबहुल भागात दाखवली होती. त्या वेळी पार्टीने सात नगरसेवक निवडून आणले होते. यंदा ही संख्या ३० वर घेऊन जाण्याचे नियोजन आहे. यासाठी पक्षाने नुकत्याच जाहीर केलेल्या पहिल्या २१ उमेदवारांच्या यादीत मुस्लिम आणि उत्तर भारतीय उमेदवारांनाच प्राधान्य दिले आहे, तर दुसरी आणि तिसऱ्या मतदार यादीतही हाच पॅटर्न राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पहिल्या उमेदवाराच्या यादीत पक्षाने २१ पैकी तब्बल १३ महिला उमेदवारांना मैदानात उतरवले असून, यात मुस्लिमेतर उमेदवारही पक्षाने दिले आहेत. यात डॉ. शीला यादव, आम्रपाली डावरे, ज्योती गुडघे, साक्षी यादव आदी महिला उमेदवारांचा यात समावेश आहे.
...
इथे असेल फोकस
समाजवादी पक्षाची मुंबईतील गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द, साकीनाका, अंधेरी, भायखळा, मुंबई सेंट्रल, नागपाडा आदी परिसरात मोठी वोट बँक आहे. यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आझमी हे मानखुर्द शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. अलीकडे एमआयएम या पक्षाचे मोठे आव्हान उभे राहिले असले तरी मागील अनेक वर्षांपासून मुंबईतील मुल्ला, मौलवी यांच्यासह उत्तर भारतीय मतदारांना समाजवादी पक्ष जवळचा वाटतो.

