स्वदेशी युद्धनौकांचा वर्षभर धडाका!

स्वदेशी युद्धनौकांचा वर्षभर धडाका!

Published on

स्वदेशी युद्धनौकांचा वर्षभर धडाका!
महासागरात भारताची ताकद अधिक ठळक
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः भारतीय नौदलासाठी २०२५ हे वर्ष केवळ कॅलेंडर बदलणारे वर्ष ठरले नाही, तर सामर्थ्य, स्वदेशीकरण आणि रणनीतिक आत्मविश्वास ठळकपणे अधोरेखित करणारे ठरले.
अत्याधुनिक युद्धनौकांची सलग भर, पाणबुडीविरोधी क्षमतेत झालेली लक्षणीय वाढ आणि हिंद महासागर क्षेत्रातील वाढती सक्रियता, यामुळे नौदलाने ‘ब्लू वॉटर नेव्ही’ म्हणून आपली ओळख अधिक मजबूत केली.
वर्षाच्या सुरुवातीलाच ऐतिहासिक टप्पा
२०२५च्या प्रारंभीच भारतीय नौदलाने एकाच वेळी विध्वंसक, फ्रिगेट आणि पाणबुडी बेड्यात सामील करून इतिहासात नवा अध्याय लिहिला. आयएनएस सुरत ही पी-१५ बी वर्गातील अत्याधुनिक स्टेल्थ विध्वंसक नौका सेवेत दाखल झाली. रडारला चकवा देणारी रचना, ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली आणि बहुआयामी युद्धक्षमता यामुळे ही नौका नौदलाच्या आक्रमक सामर्थ्याचा कणा ठरली आहे. याच काळात आयएनएस निलगिरी ही पी-१७ए वर्गातील स्टेल्थ फ्रिगेट नौदलात सामील झाली. हवाई संरक्षण, पाणबुडीविरोधी युद्ध आणि दीर्घकालीन सागरी मोहिमांसाठी सज्ज असलेली ही फ्रिगेट नौदलाच्या बहुउद्देशीय क्षमतेत भर घालणारी ठरली. या दोन युद्धनौकांसोबतच आयएनएस वागशीर ही स्कॉर्पिन वर्गातील पाणबुडी ताफ्यात सहभागी झाली. त्यामुळे पाणबुडी युद्धक्षेत्रात भारताची पकड अधिक मजबूत झाली.

स्टेल्थ फ्रिगेट्सची सलग भर
वर्षाच्या पुढील टप्प्यात आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी या आणखी दोन स्टेल्थ फ्रिगेट्सचे कमिशनिंग झाले. पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या फ्रिगेट्स बहुआयामी सागरी युद्धासाठी सक्षम आहेत. एकाच वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणावर फ्रिगेट्सची भर पडणे, हा भारतीय नौदलासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

तटीय सुरक्षा आणि पाणबुडीविरोधी सज्जता
२०२५ मध्ये केवळ खोल समुद्रातील सामर्थ्यावरच नव्हे, तर तटीय सुरक्षेलाही प्राधान्य देण्यात आले. पाणबुडीविरोधी लढ्यासाठी अंजदीप, माहे आणि अंड्रोथ या नौकांचा समावेश करण्यात आला. कमी खोलीच्या समुद्रात शत्रूच्या पाणबुड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या नौका उपयुक्त ठरणार असून, बंदर सुरक्षा आणि किनारपट्टी गस्त अधिक प्रभावी होणार आहे.

‘मेक इन इंडिया’ला निर्णायक चालना
बहुतेक सर्व नव्या युद्धनौका भारतातच डिझाइन व बांधल्या जात आहेत. परदेशी शिपयार्डवरील अवलंबित्व कमी होत असून, देशांतर्गत संरक्षण उद्योगाला मोठी चालना मिळत आहे. याच कालावधीत नौदलासाठी आधुनिक रडार प्रणाली, क्षेपणास्त्रे, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर उपकरणे आणि सागरी गस्तीची साधने खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मंजुरी देण्यात आली.

महासागरात ठसठशीत उपस्थिती
हिंद महासागर क्षेत्रात भारतीय नौदलाची हालचाल २०२५ मध्ये अधिक ठळकपणे दिसून आली. मित्रदेशांसोबत संयुक्त सागरी सराव, व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी वाढवलेली गस्त, तसेच आपत्तीग्रस्त भागात मानवीय मदत व बचाव मोहिमा यामुळे नौदलाची भूमिका संरक्षणापुरती मर्यादित राहिली नाही. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळही भारतीय नौदलाची उपस्थिती प्रभावीपणे जाणवली.

संयुक्त सरावातून जागतिक विश्वास
या वर्षात भारतीय नौदलाने अमेरिका, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन यांसारख्या देशांच्या नौदलांसोबत बहुपक्षीय आणि द्विपक्षीय सागरी सराव केले. ‘मालाबार’सारख्या सरावांमुळे हिंद महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षेबाबत भारताची भूमिका अधिक ठळक झाली. जागतिक सागरी मार्गांच्या सुरक्षेत भारत विश्वासार्ह भागीदार म्हणून पुढे येत असल्याचे या सरावांतून दिसून आले.

महिला अधिकाऱ्यांची वाढती भूमिका
२०२५ मध्ये भारतीय नौदलात महिला अधिकाऱ्यांची भूमिका अधिक ठळक झाली. युद्धनौकांवरील नियुक्त्या, ऑपरेशनल जबाबदाऱ्या आणि तांत्रिक विभागांतील सहभाग वाढला. यामुळे नौदलातील समावेशकता आणि व्यावसायिक क्षमता अधिक मजबूत झाल्याचे चित्र समोर आले.

२०२५ मध्ये भारतीय नौदलात दाखल झालेल्या मुख्य युद्धनौका

१.आयएनएस निलगिरी - स्टेल्थ फ्रिगेट
ठिकाण : मुंबई

२. आयएनएस सुरत - स्टेल्थ विध्वंसक
ठिकाण : मुंबई

३. आयएनएस वागशीर - कालवारी - क्लास पाणबुडी
ठिकाण : मुंबई

४. आयएनएस उदयगिरी - निलगिरी - क्लास फ्रिगेट
ठिकाण : विशाखापट्टणम

५. आयएनएस हिमगिरी - निलगिरी - क्लास फ्रिगेट
ठिकाण : विशाखापट्टणम

पाणबुडीविरोधी / तटीय युद्धनौका
६. आयएनएस अर्नाला - अँटी सबमरीन शॅलो वॉटर क्राफ्ट
ठिकाण : विशाखापट्टणम

७. आयएनएस अँड्रोथ - अँटी सबमरीन शॅलो वॉटर क्राफ्ट
ठिकाण : विशाखापट्टणम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com