२० वर्षांनंतर निर्णायक वळणावर मनसे!

२० वर्षांनंतर निर्णायक वळणावर मनसे!

Published on

२० वर्षांनंतर निर्णायक वळणावर मनसे!
मुंबई महापालिकेतील ‘ठाकरे युती’ ठरणार का गेमचेंजर?
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १ : मराठी अस्मिता आणि ज्वलंत हिंदुत्वाचा हुंकार मांडत राज ठाकरे यांनी दोन दशकांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुहूर्तमेढ रोवली. झंझावाती वक्तृत्व आणि आक्रमक आंदोलनांच्या जोरावर मनसेचे राजकारण अनेक चढ-उतारांतून गेले; कधी सत्तेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले, तर कधी संघर्षाच्या गर्तेत सापडले. दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले आणि मनसे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात ‘गेमचेंजर’ ठरण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे.
मनसेची वाटचाल ही संघर्षाची राहिली आहे. नव्या वर्षात राज ठाकरेंनी घेतलेली ‘ठाकरे युती’ची भूमिका त्यांच्या राजकीय भविष्याची नवी दिशा ठरवणारी असेल.

मनसेची स्थापना
शिवसेनेत अंतर्गत संघर्षानंतर ९ मार्च २००६ रोजी राज ठाकरे यांनी मातोश्रीचा उंबरठा ओलांडत थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आव्हान देत, मनसे अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जन्म दिला. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना करताना ‘मराठी अस्मिता’ आणि ‘भूमिपुत्रांचा अधिकार’ हा मूळ विचार मांडला. शिवसेनेच्या ‘मराठी कार्ड’ला राज यांनी अधिक आक्रमक आणि आधुनिक स्वरूप दिले. निळा, पांढरा, भगवा आणि हिरवा अशा रंगांचा समावेश असलेला ध्वज घेऊन राज यांनी सर्वसमावेशकतेचा प्रयत्न केला; मात्र लवकरच त्यांनी ‘खळ्ळ-खट्याक’ स्टाइलने मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी आंदोलने करीत राज्याच्या राजकारणात आपले स्थान निश्चित केले.

​निवडणुकीचे राजकारण : भरारी आणि घसरण
मनसेच्या उदयामुळे शिवसेनेच्या पारंपरिक मतपेढीला हादरे बसण्यास सुरुवात झाली. स्थापनेच्या अवघ्या वर्षभरात २००७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये मनसेने सात जागांवर आपले खाते उघडले. ​२००९ची विधानसभा निवडणूक मनसेसाठी सुवर्णकाळ ठरली. १३ आमदार निवडून आणत राज ठाकरे यांनी ‘किंगमेकर’ची भूमिका बजावली. २०१२च्या मुंबई पालिका निवडणुकीत मनसेचे तब्बल २८ नगरसेवक विजयी झाले. त्याचा फटका शिवसेनेला बसला, शिवसेनेचे संख्याबळ ८४ वरून ७५ वर घसरले; मात्र त्यानंतर शिवसेनेने ही पडझड थोपवून धरली. दुसरीकडे मनसे नेतृत्‍वाच्या धोरण सातत्याच्या अभावामुळे पक्षाचा प्रभाव घसरत गेला व पालिकेतही मनसेचा आलेख खाली येत गेला. २०१७ मध्ये मनसेला सात जागांवर समाधान मानावे लागले. नाशिक महापालिकेची सत्ता हातातून जाणे आणि आमदारांची संख्या एकावर येणे, हा मनसेसाठी मोठा धक्का होता.

बदलत्‍या ​राजकीय भूमिका
​राज ठाकरे यांचे राजकारण त्यांच्या बदलत्या भूमिकांसाठी ओळखले जाते. ​सुरुवातीला परप्रांतीयांविरोधी आक्रमक भूमिका घेतली गेली. ​त्यानंतर ‘ब्लू प्रिंट’च्या माध्यमातून विकासाचे राजकारण,​ २०१९ मध्ये ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधी घेतलेली भूमिका ​आणि त्यानंतर पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ‘हनुमान चालिसा’ आणि मशिदींवरील भोंग्यांविरोधी पुकारलेले आंदोलन, या भूमिकांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला, तरी मतदारांमध्ये काहीसा संभ्रमही निर्माण केला.

​ठाकरे बंधू एकत्र
उद्धव आणि राज ठाकरे या दोन भावांनी एकत्र येण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ भावनिक नसून राजकीय अपरिहार्यता आहे. ‘ठाकरे’ हा ब्रँड एकत्रितपणे लढल्यास मराठी मतांचे विभाजन थांबेल, अशी चिन्हे आहेत. ही युती होऊ घातलेल्या महापालिका आणि विधानसभा निवडणुकांचे समीकरण पूर्णपणे बदलू शकते.

​नेतृत्व आणि संभाव्य वाटचाल
​राज ठाकरे यांचे वक्तृत्व आणि झंझावाती नेतृत्व ही आजही मनसेची सर्वात मोठी संपत्ती आहे; पण पक्षाला आता केवळ भाषणांच्या पलीकडे जाऊन संघटनात्मक बांधणीवर भर द्यावा लागणार आहे. ‘हिंदुत्व’ आणि ‘मराठी अस्मिता’ या दोन मुद्द्यांची सांगड घालून ठाकरेंसोबत युती करून मनसे सत्तासंघर्षात उतरली आहे. त्यांना आता यश मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेची कामगिरी
२०१७ - ७ जागा
२०१२- २८ जागा
२००७ - ७ जागा

गेली काही वर्षे मनसे आणि शिवसेना (ठाकरे) या दोन्ही पक्षांना ज्या आव्हानांचा सामना करावा लागला, त्यातून एकत्रित ठाकरे ब्रँड हाच एकमेव प्रभावी पर्याय उरला आहे. राज ठाकरेंची आक्रमकता आणि उद्धव ठाकरेंची सहानुभूती एकत्र आल्यास मराठी मतांचे विभाजन थांबेल.
- हेमंत देसाई, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक

राज ठाकरे यांनी बऱ्याच वर्षांनंतर बेरजेचे राजकारण केले आहे. दोन्ही भावांनी एकत्र येण्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होईल, यात शंका नाही; मात्र यशस्वी होण्यासाठी केवळ नेत्यांनी एकत्र येणे पुरेसे नाही, तर दोन्ही पक्षांच्या संघटनात्मक रचनेमध्ये सुसूत्रता येणे गरजेचे आहे. संयुक्त सभांचे नियोजन चोख झाले, तर प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या मतपेटीला मोठे खिंडार पडण्याची क्षमता आहे; मात्र मराठी कार्ड मतदारांना किती रुचेल, हे पाहावे लागेल.
- सुमीत म्हसकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com