बडखोरी थोपवण्यात भाजप अपयशी
बंडखोरी थोपवण्यात भाजप अपयशी
भांडुप, विक्रोळीतील दोन बंडखोर शिवसेनेविरोधात लढणार
मुंबई, ता. २ ः भांडुप, विक्रोळी या मराठमोळ्या मतदारसंघांतील बंडखोरी रोखण्यात भाजपला अपयश आले. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील प्रत्येकी एका प्रभागात भाजपचे पदाधिकारी महायुतीतील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांविरोधात लढणार आहेत.
भांडुपमधील प्रभाग क्रमांक १०९ शिवसेनेच्या (शिंदे गट) पारड्यात पडल्याने भाजपचे मंडल महामंत्री गणेश जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत बंडाचे निशाण फडकावले. शेजारील ११० प्रभागांत भाजपने मुंबईबाहेरून उमेदवार आयात केल्याने निष्ठावंत कार्यकर्त्या मीरा ठाकूर अपक्ष लढण्याच्या तयारीत होत्या. ठाकूर यांच्या बंडखोरीमुळे प्रभागातील संभाव्य हानीचे गणित मांडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाकूर यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले; मात्र जाधव यांनी प्रभाग १०९ मधून बंड कायम ठेवले. गेल्या लढतीत याच प्रभागातून जाधव यांनी अपक्ष लढत चार हजार मते घेतली, तर भाजपच्या उमेदवाराला तीन हजार मते मिळवता आली. विक्रोळीत प्रभाग ११९ येथून भाजपच्या वॉर्ड अध्यक्ष श्रुती घोगळे, १२० मधून दिलीप मठकर आणि ११८ मधून प्रकाश बाबर यांच्या कन्या धनश्री बंडखोरीच्या तयारीत होत्या. मठकर आणि बाबर यांनी शुक्रवारी बंड मागे घेतले; मात्र घोगळे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय कायम ठेवला.
...
मनसेच्या बंडखोर नॉट रिचेबल
भांडुपमधील ११४ प्रभागांतील मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांनी बंडखोरी कायम ठेवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव येत होता. शुक्रवारी दुपारी ३ वाजता अर्ज मागे घेण्याची मुदत संपत असल्याने गुरुवारी रात्री त्यांच्यावरील दबाव आणखी वाढला. त्यांना पाठिंबा देणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांनाही दम देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे माजगावकर शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत नॉट रिचेबल होत्या. दिवसभर त्यांच्याशी संपर्क न होऊ शकल्याने ठाकरे बंधूंच्या आघाडीतील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा नाईलाज झाला. या पार्श्वभूमीवर येथे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय पाटील यांच्या कन्या राजुल आणि बंडखोर माजगावकर यांच्यात थेट लढत अपेक्षित आहे.
...
मनसे कार्यकर्त्यांचे राजीनामे
भांडुपमधील मनसेच्या माजी नगरसेविका वैष्णवी सरफरे यांच्यासह २० ते २५ महिला पदाधिकाऱ्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विठ्ठलाशी नव्हे, तर बडव्यांमुळे हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. उमेदवार निवडीत अन्याय झाल्याचे त्यांनी सांगितले.
...
मुलुंडमध्ये सेनेच्या बंडखोरांची माघार
मुलुंडमध्ये सर्व सहा प्रभाग भाजपच्या वाट्याला गेल्याने त्यातील पाच ठिकाणी शिवसेनेच्या (शिंदे) पदाधिकाऱ्यांनी अपक्ष अर्ज भरले होते. शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ नेत्यांनी समजूत काढून या सर्वांना माघार घेण्यास भाग पाडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

