बंड थोपवले, पण नाराजीची धग कायम!
बंड थोपवले, पण नाराजीची धग कायम
मनधरणीचे उमेदवारांना टेन्शन; कार्यकर्त्यांना आतून फूस
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबई महापालिकेच्या निवडणूक रिंगणातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी फोनाफोनी करून आपल्या पक्षातील बंडखोरी काही प्रमाणात थोपवली आहे. त्यामुळे दिवसभरात ४५३ जणांनी माघार घेतली असली तरी त्यांच्या नाराजीची धग स्वपक्षीय उमेदवारांसाठी कायम असणार आहे. पक्षश्रेष्ठींच्या शब्दाखातर अनेक जण एक पाऊल मागे आले असले तरी त्यांची मनधरणी कशी करायची, निवडणुकीत सहकार्य कसे मिळवायचे याचे टेन्शन पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना असणार आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फाटाफूट, सुरुवातीला भाजपने दिलेला स्वबळाचा नारा यामुळे निवडणूक रिंगणात मोठ्या प्रमाणात जागा निर्माण झाली होती. त्यामुळे सर्वच पक्षांनी अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार संबंधितांनी प्रभागात संघटन बांधणी मजबूत करतानाच सामाजिक उपक्रम राबवत आपला जनसंपर्क वाढवला होता. मात्र भाजप-शिवसेनेचे एकत्रित लढणे, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाल्याने एकमेकांना जागा सोडाव्या लागल्या आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी कंबर कसलेल्या, पक्ष बदललेल्या अनेकांची कोंडी झाली होती.
त्यामुळे त्यांनी पक्षाकडून अधिकृत तिकीट मिळत नसल्याचे दिसताच बंडखोरी करीत अपक्ष अर्ज भरला होता. त्यामुळे निवडणुकीत फटका बसू शकेल हे निदर्शनास आल्याने सर्वच पक्षांनी बंडखोरांना थंड केले आहे.
आयत्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पक्षप्रमुखांचा फोन आल्याने डावलायचे कसे म्हणून त्यांनी माघार घेतली असली तरी ज्यांच्यामुळे आपल्याला माघार घ्यावी लागली त्याची परतफेड केल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत. त्यामुळे माघार घेतलेल्या बंडखोरांना उमेदवार आपलेसे कसे करतात, हे पाहावे लागणार आहे.
कार्यकर्त्यांना आतून फूस
पक्षश्रेष्ठींनी सांगितले म्हणून काही बंडखोरी शांत झाले आहेत. तसेच अधिकृत उमेदवाराच्या पराभवाचे खापर आपल्यावर नको म्हणून काही जण प्रचारात दिसतीलही. पण कार्यकर्त्यांना आतून फूस लावत विरोधात काम करू शकतात. नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत इच्छुक बंडखोर आपले उपद्रवमूल्य दाखवण्याची संधी सोडतील असे वाटत नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
आर्थिक भरपाईचा प्रश्न
स्वबळावर पालिका निवडणूक लढण्याची वेळ आली तरी प्रबळ उमेदवार हवा म्हणून सर्वच पक्षांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे २०२२ पासून संबंधित इच्छुक पक्षाचे कार्यक्रम लावणे, विभागातील महिलांना, ज्येष्ठांना देवदर्शन असे उपक्रम राबवत होते. प्रभागातील प्रबळ दावेदार म्हणून अनेकांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वतः मेहनत घेत पैसे खर्च करून उमेदवारांना मताधिक्य मिळवून दिले आहे. त्यामुळे या खर्चाची भरपाई कोण करणार, असा सवाल बंडखोरांकडून केला जात आहे.
संधी हुकल्याची हुरहुर
वर्षावर्षे एकाच प्रभागात काम करणाऱ्या दोन इच्छुकांपैकी पक्षाने एकाला अधिकृत उमेदवारी दिली. त्यामुळे पक्षाने आपल्याला डावल्याची सल बंडखोरांच्या मनामध्ये आहे. तसेच एकदा का सध्याचा उमेदवार निवडून आला की तो कायमचा दावेदार होतो. त्यामुळे आपली कायमची संधी हुकल्याची हुरहुर बंडखोरांच्या मनात आहे. त्यामुळे ते कितपत पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी काम करतील, हा प्रश्न आहे.
आज राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दबाव आणून, आश्वासन देऊन बंडखोरांच्या तलवारी म्यान करण्यास भाग पाडले आहे. मात्र संबंधितांची नाराजी दूर करून त्याला प्रचारात सक्रिय करण्याची जबाबदारी पक्षाच्या उमेदवाराची असणार आहे. त्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागेल.
- अभय देशपांडे, राजकीय विश्लेषक
बंडखोरांनी माघार घ्यावी म्हणून समजूत काढली जाते, मनधरणी केली जाते. पण गेल्या दोन-तीन दिवसांत धमकीवजा समजूत काढण्याचे प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी इच्छा नसतानाही माघार घेतली आहे. त्यामुळे ते दाखवण्यासाठी अधिकृत उमेदवाराचे काम करतील, पण विजयासाठी नाही.
- हेमंत देसाई, राजकीय विश्लेषक
- पात्र उमेदवारी अर्ज - २,१८५
- अखेरच्या दिवशी माघार - ४५३
- २२७ जागांसाठी मैदानातील उमेदवार - १,७२९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

