ईशान्य मुंबईत प्रबळ बंडखोरांचे सर्वच पक्षांना आव्हान
ईशान्य मुंबईत प्रबळ बंडखोरांचे सर्वच पक्षांना आव्हान
अटीतटीच्या लढतीत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता
जयेश शिरसाट ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः शहरात बंडोबांना शांत करण्यात त्या त्या पक्षांना यश आले असले तरी ईशान्य मुंबईत मात्र बहुपक्षीय बंडखोरी कायम आहे. या बंडखोरीमुळे ईशान्य मुंबईतील किमान पाच ते सहा प्रभागांमध्ये अटीतटीची लढत होऊन धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक ११४ ( भांडुप )
मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांनी बंडखोरी केल्याने येथून माजगावकर विरुद्ध उबाठा गट अशी प्रमुख लढत होईल. उबाठा गटाकडून खासदार संजय पाटील यांच्या कन्या राजुल रिंगणात आहेत. यंदा ठाकरे बंधूंची आघाडी असली तरी या प्रभागातील स्थानिक मनसे पदाधिकारी माजगावकर यांच्यासोबत असल्याने अधिकृत उमेदवार राजुल यांच्या अडचणी वाढू शकतात. गेल्या लढतीत माजगावकर यांनी मनसेतर्फे ८३०२ मते घेतली होती.
१०९ (भांडुप)
या प्रभागातून भाजप आणि उबाठा गटातून बंडखोरी झाली आहे. भाजपचे मंडल महामंत्री गणेश जाधव आणि उबाठा गटाच्या माजी नगरसेविका दीपाली गोसावी अपक्ष म्हणून लढणार आहेत. गेल्या लढतीत गोसावी ८,७०७ मते घेत विजयी झाल्या. तर दुसऱ्या क्रमांकावर जाधव यांच्या मातोश्री यांनी सुमारे चार हजार मते घेतली. भाजपचा अधिकृत उमेदवार तीनच हजार मते पारड्यात पाडू शकला. यंदा उबाठा गटाने स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध आणि गोसावी यांना डावलून माजी नगरसेवक सुरेश शिंदे यांना संधी दिली. तर महायुतीच्या वाटाघाटीत हा प्रभाग शिंदे सेनेच्या वाट्याला आला. त्यामुळे या प्रभागात दोन बंडखोरांसह पाच उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
११९ (विक्रोळी)
या प्रभागातून भाजप आणि शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करीत अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे. भाजपच्या वॉर्ड अध्यक्षा श्रुती घोगळे तर शिंदे गटातून संदीप खरात यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या प्रभागात महायुतीतील शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार राजेश सोनावळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले विश्वजीत ढोलम यांना मनसेने येथून संधी दिली आहे. प्रत्यक्षात येथे मनसेने शाखा अध्यक्ष संतोष देसाई यांना उमेदवारी दिली होती. मात्र अवघ्या तासाभरात ती ढोलम यांना फिरवण्यात आली. त्यामुळे स्थानिक मनसेचे पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
१३१(घाटकोपर पूर्व)
राष्ट्रवादीतून (शरद पवार गट) भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या राखी जाधव यांना भाजपने या प्रभागातून उमेदवारी दिल्याने निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. या प्रभागातून भाजप पदाधिकारी अजय बागल यांच्या पत्नी धनश्री यांनी बंडखोरी करीत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७मध्ये भाजपने या प्रभागातून प्रबळ दावेदार असलेल्या बागल यांना एबी फॉर्म दिला. मात्र अखेरच्या क्षणी माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांची उमेदवारी जाहीर केली. यंदाही बहरून पक्षात आलेल्या जाधव यांना उमेदवारी दिल्याने बागल यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला.
१२३ (घाटकोपर पश्चिम)
प्रभाग भाजपच्या वाट्याला गेल्याने शिंदे गटाचे पदाधिकारी सुबोध बावधने यांच्या पत्नी भारती यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला होता. अखेरच्या क्षणी त्यांना स्वबळावर लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. या प्रभागात भाजप, उबाठा गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांमध्ये लढत अपेक्षित आहे.
१०५ (मुलुंड)
मुलुंडमधील सर्व सहा प्रभाग भाजपच्या वाट्याला गेल्याने शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाच प्रभागांमधून अपक्ष अर्ज भरले होते. त्यातील चौघांनी माघार घेतली. मात्र मनसेच्या माजी नगरसेविका आणि सध्या शिंदे सेनेत दाखल झालेल्या सुजाता पाठक यांनी उमेदवारी कायम ठेवली. मराठी मतदारांचे प्राबल्य असलेल्या या प्रभागात पाठक यांच्या उमेदवारीने भाजपच्या अनिता वैती, उबाठाच्या अर्चना चौरे यांच्यासमोरील अडचणी वाढू शकतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

