ठाकरेंचा साडेतीन लाख कोटींचा महाघोटाळा ठाकरेंचा साडेतीन लाख कोटींचा महाघोटाळा
ठाकरेंचा साडेतीन लाख कोटींचा महाघोटाळा
अमित साटम यांचा घणाघात; भाजपकडून ‘आरोपपत्र’ प्रसिद्ध
सकाळ वृत्तसेबा
मुंबई, ता. ४ : महापालिकेत २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबईकरांच्या कष्टाच्या तीन लाख ५० हजार कोटी रुपयांवर डल्ला मारून महाघाेटाळा केल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी केला आहे. ठाकरे गटाने जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या काही तासांतच भाजपने त्यांच्याविरोधात ‘आरोपपत्र’ प्रसिद्ध करून भ्रष्टाचाराचा पाढा वाचला आहे.
पत्रकार परिषदेत अमित साटम म्हणाले, ‘रस्ते, कचरा, कोविड सेंटर, टॅब खरेदी आणि नालेसफाई अशा प्रत्येक कामात घोटाळा झाला आहे. २१ हजार कोटी रुपये खर्च करूनही मुंबई खड्डेमुक्त झालेली नाही. काळ्या यादीतील कंपन्यांना कंत्राटे देऊन मुंबईकरांची लूट करण्यात आली आहे. हा घोटाळा केवळ राज्यातील नव्हे, तर देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे.’
साटम पुढे म्हणाले, ‘कोविड काळात शवपेटी घोटाळा झाला आहे. १,५०० रुपयांची बॉडी बॅग सहा हजार ७२१ रुपयांना खरेदी करण्यात आली. ऑक्सिजन प्लांटमध्ये ३२० कोटींचा घोटाळा झाला आहे. कोविड काळातही ठाकरेंच्या जवळच्या लोकांनी पैसे कमावले.’
मराठीविषयी कळवळा दाखवणाऱ्यांच्या सत्ताकाळाच्या १० वर्षांत ११४ मराठी शाळा बंद पडल्या. टॅब खरेदीत ४० कोटींचा भ्रष्टाचार झाला. नालेसफाईच्या नावाने कंत्राटदारांचे खिसे भरले गेले. याबाबत ‘कॅग’ने १,२०० कोटींच्या अनियमिततेवर ताशेरे ओढले आहेत. गारगाई-पिंजाळ प्रकल्प रखडवून पाणी करात वाढ करण्यात आली. वैयक्तिक हट्टापोटी मेट्रो प्रकल्पांना स्थगिती देऊन राज्याचे १० हजार कोटींचे नुकसान केल्याचा दावाही साटम यांनी केला. भाजपच्या या ‘आरोपपत्रा’मुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भ्रष्टाचार आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. या आराेपपत्राला ठाकरे गट काय प्रत्युत्तर देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईविराेधात आंतरराष्ट्रीय षड्यंत्र
साटम यांनी ठाकरे गटावर गंभीर आराेप केले. मतांच्या राजकारणासाठी ठाकरे गटाने मुंबईची सुरक्षा धोक्यात आणली आहे. ‘मामू’ची टोळी या शहराचा रंग बदलण्यासाठी सज्ज झाली असून, उद्धव ठाकरे या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचे भागीदार आहेत. बॉम्बस्फोटाचे आरोपी आणि देशद्रोही घोषणा देणाऱ्यांना पक्षात प्रवेश देऊन मुंबईला कोणत्या दिशेला नेले जात आहे, असा सवालही अमित साटम यांनी केला.
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

