सर्व लोकल वातानुकूलित करणार
‘बिनविरोध’वरून आरडाओरड!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः आतापर्यंत भाजपच्या विजयाविरोधात ईव्हीएमच्या नावाने ओरडणारे विरोधक, आता बिनविरोध विजयावरून आरडाओरड करीत आहेत. महापालिका निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काहीतरी सबब सांगण्यासाठी ते कथा रचत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कांदिवलीत झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. महायुतीच्या भीतीमुळे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. हा प्रीतीसंगम नसून भीतीसंगम आहे, अशी खिल्लीही मुख्यमंत्र्यांनी उडवली.
मुंबईला अधिक वेगवान करण्यासाठी विविध पायाभूत प्रकल्पांना गती दिली जात आहे. कोस्टल रोड उभारल्यानंतर पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी संपेल. त्याचे भाईंदरपर्यंतचे काम २०२८ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर तो पुढे विरारपर्यंत नेला जाईल. पश्चिम द्रुतगती मार्गाला समांतर असलेला गोरेगाव-मागाठाणे डीपी रोडही दोन वर्षांत पूर्ण करू. बोरिवली-ठाणे बोगद्यामुळेही ठाण्यापर्यंत लवकर जाता येईल. या प्रकल्पांना सर्वोच्च न्यायालयातून संमती मिळाल्याने आता थांबावे लागणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
----
सर्व लोकल वातानुकूलित!
१. उपनगरी रेल्वेतून प्रवासी पडून अपघात होत असल्याने आता सर्व उपनगरी रेल्वेची दारे बंद होऊन त्या वातानुकूलित केल्या जाणार आहेत; मात्र त्यांचे तिकीट वाढणार नाही, हे मुंबईकरांना मिळालेले गिफ्ट असेल.
२. मुंबईतील ४७५ किलोमीटरचे मेट्रो जाळे २०२८ पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडीत रखडावे लागणार नाही. वांद्रे-वरळी सेतूच्या पुढे वरळी-शिवडी उन्नत मार्गही पुढील वर्षअखेरपर्यंत पूर्ण होईल. तेथून अटल सेतूमार्गे नवी मुंबई विमानतळावर ४० मिनिटांत जाता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
---
नदी शुद्घीकरणाचे काम सुरू
नद्या, समुद्र स्वच्छ करण्यासाठी मालाड येथे उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी चार हजार कोटी मंजूर झाले आहेत. दहिसर, पोईसर, मिठी, ओशिवरा नद्या शुद्ध करण्यासाठी अडीच हजार कोटींचे काम सुरू केले आहे. महापालिकेत आम्ही पारदर्शी आणि प्रामाणिक काम करून मुंबईचा चेहरा बदलू आणि मुंबईकरांच्या जीवनातही बदल घडवू. पुढील पाच वर्षे तुमची काळजी आम्ही घेऊ, हे वचन देतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

