मुंबईत भाजपचा ठाकरे गटाशी ‘महामुकाबला’!

मुंबईत भाजपचा ठाकरे गटाशी ‘महामुकाबला’!

Published on

मुंबईत भाजपचा ठाकरे गटाशी ‘महामुकाबला’!
९५ जागांवर थेट संघर्ष; चुरशीच्या लढतींकडे राज्याचे लक्ष

मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेला
मुंबई, ता. ४ : महापालिकेच्या निवडणुकीत यंदा अभूतपूर्व रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. महापालिकेत २७ वर्षांनंतर पहिल्यांदाच शिवसेना (ठाकरे गट) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) आमनेसामने असून, मुंबईतील ९५ प्रभागांत या दोन पक्षांत थेट सामना होणार आहे. दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून, एकमेकांना रोखण्यासाठी खास डावपेच आखले आहेत.

निवडणुकीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अनेक बड्या नेत्यांची मुले आणि नातेवाईक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. प्रभाग ५४ (दिंडोशी) येथून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचे पुत्र अंकित प्रभू यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यांचा सामना भाजपच्या विप्लव अवसरे यांच्याशी होणार आहे. प्रभाग ६४ (अंधेरी)मधून आमदार हारून खान यांची कन्या सबा खान (ठाकरे गट) आणि भाजपच्या सरिता राजपुरे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळेल. प्रभाग २२१ (मलबार हिल)मधून भाजप नेते राज पुरोहित यांचे पुत्र आकाश पुरोहित यांच्या विरोधात ठाकरे गटाचे अभिजित गुरव मैदानात आहेत.

कुलाबा आणि दक्षिण मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या परिवाराचे वर्चस्व आहे. ठाकरे गटाने तिथे कडवे आव्हान उभे केले आहे. प्रभाग २२५मधून राहुल नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर (भाजप) आणि ठाकरे गटाचे अजिंक्य धात्रक यांच्यात हाय व्होल्टेज सामना आहे. प्रभाग २२७मधून नार्वेकर यांच्या चुलत भगिनी गौरवी शिवलकर नार्वेकर (भाजप) यांचा सामना ठाकरे गटाच्या रेहाना शेख यांच्याशी होणार आहे.

माजी महापौरांची प्रतिष्ठा पणाला
प्रभाग ८७मधून दिवंगत माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पत्नी पूजा महाडेश्वर यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना भाजपच्या कृष्णा पारकर यांच्याशी होईल. प्रभाग १८२ (धारावी)मधून माजी महापौर मिलिंद वैद्य (ठाकरे गट) आणि भाजपचे राजन पारकर यांच्यातील लढत अटीतटीची मानली जात आहे.

रवि राजा विरुद्ध ठाकरे गट
काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी विरोधी पक्षनेते रवि राजा यांच्या प्रभागातील समीकरणे बदलली आहेत. प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने भाजपने त्यांना दुसऱ्या प्रभागातून (१८५) रिंगणात उतरवले आहे. तिथे त्यांचा सामना ठाकरे गटाच्या जगदीश तिवालप्पी यांच्याशी होणार आहे.
.......
इतर काही प्रमुख लढती
प्रभाग : भाजप : ठाकरे गट
३ : प्रकाश दरेकर : रोशनी गायकवाड
९ : शिवानंद शेट्टी : संजय भोसले
४७ : तेजिंदर तिवाना : गणेश गुरव
५२ : प्रीती सानप : सुप्रिया गाढवे
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com