ठाकरे बंधूंची हायटेक रणनीती
ठाकरे बंधूंची हायटेक रणनीती
आदित्य, अमित ठाकरेंनी उचलले प्रचाराचे ‘शिवधनुष्य’
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : महापालिकेच्या सत्तेचा सोपान सर करण्यासाठी मुंबईतील राजकारणात एक ऐतिहासिक समीकरण बनले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी युती करीत एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही दिग्गज नेत्यांनी युतीची वज्रमूठ बांधली असून, या निवडणुकीच्या प्रचाराची संपूर्ण धुरा आता घरातील पुढच्या पिढीवर म्हणजेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मुख्य जाहीर सभांचे वादळ मुंबईत घोंगावणार असले, तरी प्रत्यक्ष मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे खरे ‘शिवधनुष्य’ या दोन युवा नेत्यांनी उचलले आहे. आता त्यांची ही हायटेक रणनीती आणि बूथ लेव्हलची बांधणी मुंबईकरांना किती आकर्षित करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
युवा नेत्यांचे सूक्ष्म नियोजन आणि बूथवर लक्ष
या निवडणुकीत युवा नेते आदित्य आणि अमित ठाकरे ही जोडी केवळ ‘स्टार प्रचारक’ म्हणून मर्यादित न राहता, प्रत्यक्ष स्थानिक पातळीवर कामाला लागली आहे. त्यांनी प्रचारासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन केले आहे.
मिशन ५२ टक्के मतदान
फक्त प्रभागच नाही, तर प्रत्येक बूथवर पक्षाला किमान ५२ टक्के मते मिळतीलच, असा चोख आराखडा त्यांनी तयार केला आहे. बूथ लेव्हलला ही बांधणी मजबूत करण्यासाठी त्यांनी पक्षातील जुनेजाणते आणि अनुभवी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे. जुन्या पिढीचा अनुभव आणि नवीन पिढीचे तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालत ही रणनीती आखली आहे.
हायटेक प्रचार आणि मिनी जाहीरनामे
प्रचाराच्या पारंपरिक पद्धतींना फाटा देत या युवा नेत्यांनी हायटेक प्रणालीचा स्वीकार केला आहे. कशा प्रकारे प्रचार करायचा आणि मतदारांशी संवाद कसा साधायचा, याबाबत त्यांनी विशेष प्रेझेंटेशनद्वारे उमेदवारांना प्रशिक्षण दिले आहे.
प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र व्हिजन
मुंबईच्या मुख्य जाहीरनाम्याव्यतिरिक्त, आदित्य आणि अमित यांनी मुंबईकरांच्या स्थानिक समस्यांवर आधारित ‘मिनी जाहीरनामे’ तयार केले आहेत. या माध्यमातून गल्लीबोळातील बारीकसारीक नागरी सेवा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
तरुण मतदारांना साद :
आजच्या तरुण मतदारांना, विशेषतः ‘जेन-झी’ पिढीला आकर्षित करण्यासाठी या युवा नेत्यांनी विशेष रणनीती आखली आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि तरुणांना भावणाऱ्या आधुनिक मुद्द्यांवर त्यांनी भर दिला आहे. रॅली, जाहीर सभांसोबतच प्रत्येक प्रभागातील ‘नुक्कड सभा’ आणि थेट संवादाच्या माध्यमातून हे युवा नेते मतदारांच्या थेट संपर्कात राहणार आहेत.
कामाचा अहवाल आणि भविष्याचा आराखडा
लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी या जोडीने दोन महत्त्वाच्या स्तरांवर काम सुरू केले आहे. प्रथम दोन्ही पक्षांनी आतापर्यंत केलेली विकासकामे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि दुसरे म्हणजे, येत्या काळात मुंबईच्या विकासाचा काय आराखडा असेल, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

