प्रदेशाध्यक्ष, खासदार, आमदाराची प्रतिष्ठा पणाला
प्रदेशाध्यक्ष, खासदार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला
भांडुपचा बालेकिल्ला राखण्याचे ठाकरे बंधूंसमोर आव्हान
जयेश शिरसाट ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः भांडुप विधानसभा मतदारसंघातील सात प्रभागांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह खासदार संजय पाटील, आमदार अशोक पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बंडखोरीमुळे या तिन्ही प्रभागांमध्ये या मातब्बरांच्या उमेदवारांना कडवे आव्हान निर्माण केले आहे. जनमत या मातब्बरांची प्रतिष्ठा कायम ठेवते की उधळून लावते, याबाबत शहरात कमालीची उत्सुकता आहे.
मराठी, त्यातही तळकोकणातील मतदारांचे प्राबल्य असलेल्या भांडुपमध्ये सात प्रभाग असून गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे चार, भाजपचा एक तर काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले. गेल्या लढतीत सर्वच प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर लढले होते. यंदा महायुती, ठाकरे बंधूंची आघाडी आहे.
या लढतीत भांडुपमधील ११४ प्रभागात मनसेच्या माजी नगरसेवक अनिशा माजगावकर यांच्या बंडखोरीमुळे सुरुवातीपासूनच प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. त्या अपक्ष रिंगणात उतरल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय पाटील यांच्या कन्या राजुल यांच्यासमोर तगडे आव्हान उभे ठाकले आहे. प्रभागाबाहेर राहणाऱ्या आणि पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या राजुल यांची सर्वस्वी भिस्त स्वपक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची साथ, मित्र पक्ष असलेल्या मनसेच्या पाठिंब्यावर असेल. शिवसेनेच्या (शिंदे गट) धुरत रिंगणात असल्या तरी प्रमुख लढत माजगावकर, पाटील यांच्यात अपेक्षित आहे.
शेजारील प्रभाग क्रमांक ११५ मधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे बालमित्र संजय परब यांच्या पत्नी स्मिता यांना महायुतीने रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. राजकारणात येण्याआधी चव्हाण बरीच वर्षे भांडुपमध्ये वास्तव्यास होते. त्यामुळे या प्रभागातील लढत त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरेल, अशी चर्चा आहे. भाजपच्या स्मिता यांच्यासमोर मनसेच्या ज्योती राजभोज रिंगणात आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) उपविभागप्रमुख नेहा पाटकर यांनी बंडखोरी केल्याने येथे तिरंगी लढत अपेक्षित आहे.
प्रभाग क्रमांक ११३ मधून आमदार अशोक पाटील यांचे पुत्र रूपेश यांना शिवसेनेची (शिंदे) उमेदवारी मिळाली आहे. या प्रभागात भाजपचे पदाधिकारी शैलेश सुवर्णा यांनी बंडखोरी केली असून ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका दीपमाला बढे रिंगणात आहेत; मात्र येथील लढत पाटील विरुद्ध बढे अशी दुरंगी होण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका दीपाली गोसावी आणि भाजप पदाधिकारी गणेश जाधव यांनी बंडखोरी केल्याने प्रभाग क्रमांक १०९ मधील लढत अटीतटीची होऊ शकेल. गेल्या लढतीत जाधव यांच्या मातोश्रींनी अपक्ष लढत चार हजार मते घेतली होती. सामाजिक कार्याच्या माध्यमातून जाधव यांनी गेल्या आठ वर्षांत येथे मजबूत पकड निर्माण केली आहे. जाधव, गोसावी यांनी शिवसेनेच्या (शिंदे) राजश्री मंदविलकर आणि ठाकरे गटाचे सुरेश शिंदे या अधिकृत उमेदवारांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.
या आहेत प्रमुख समस्या
- मालकी हक्काच्या अडचणीमुळे अडकून पडलेल्या झोपू योजना
- अरुंद, चिंचोळ्या मार्गांमुळे हरप्रहरी वाहतूक कोंडी होते. डोंगराळ भागातील अनेक वस्त्यांपर्यंत आजही पायवाटा आहेत.
- अनेक वर्षांपासून भेडसावणारा पाणीप्रश्न
- रुग्णालय, क्रीडांगण, बगिचे नाहीत.
- वाढलेली गुन्हेगारी विशेषतः अमली पदार्थ सेवन, विक्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

