प्रचार कार्यालयांच्या उद्‍घाटनातून रणधुमाळी

प्रचार कार्यालयांच्या उद्‍घाटनातून रणधुमाळी

Published on

प्रचार कार्यालयांच्या उद्‍घाटनातून रणधुमाळी
नेत्यांचे गल्लीबोळात दौरे; घरोघरी जनसंपर्काला वेग

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : निवडणुकीच्या प्रचाराला दिवसेंदिवस वेग येऊ लागला असून राजकीय वातावरण तापत आहे. उमेदवार निश्चित झाल्यानंतर विविध पक्षांकडून प्रचार कार्यालयांच्या उद्‍घाटनाचा धडाका सुरू आहे. या उद्‍घाटनांच्या निमित्ताने पक्षांचे प्रमुख नेते आणि स्टार प्रचारक गल्लीबोळात फिरून घरोघरी भेटी देत थेट मतदारांशी संवाद साधत आहेत.

‘एमआयएम’तर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार, बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी गोवंडी येथे नुकतीच जाहीर सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. या वेळी त्यांनी उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचेही उद्‍घाटन केले. विकास, योग्य प्रतिनिधित्व आणि स्थानिक प्रश्नांवर भाष्य करीत कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन ओवेसी यांनी केले. एमआयएम आणि समाजवादी पक्षाने मुस्लिमबहुल प्रभागांवर विशेष लक्ष केंद्रित केले असून अर्ज छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने निवडणूक रिंगणाचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराची गती वाढली असून, प्रचार कार्यालयांच्या उद्‍घाटनाच्या निमित्ताने सभा, दौरे आणि घरोघरी भेटी वाढताना दिसत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत असून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेतेही रस्त्यावर उतरल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यानंतर, अनेक मोठी मंडळी प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. यासह पक्षाचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील हेदेखील प्रचारसभांना उपस्थित राहून स्थानिक मतदारांचा उत्साह वाढवतील. सध्या एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण हे मुंबईतील प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. सोमवारी (ता. ५) संध्याकाळी त्यांनी जोगेश्वरी येथे प्रचारसभा घेत मतदारांना संबोधित केले. तसेच मुंबईचा महापौर अल्पसंख्याक समाजातील का होऊ शकत नाही का, असा सवाल त्यांनी त्यांच्या मुंब्रा येथे झालेल्या प्रचारसभेत उपस्थित केला. उमेदवार आपल्या प्रचारातून स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत असून पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधा यांसारख्या मुद्द्यांवर नागरिकांशी चर्चा केली जात आहे. त्यामुळे प्रचार केवळ पोस्टर-बॅनरपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष जनसंपर्कावर भर दिला जात आहे.

..
समाजवादी पक्षाचे स्टार प्रचार मुंबईत दाखल
समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी मानखुर्द विधानसभा मतदारसंघातील प्रभागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तसेच मुंबईतील इतर भागांतही ते स्वतः जाऊन उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचे उद्‍घाटन करीत आहेत. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजनांचे आश्वासन देत थेट संवाद साधण्यावर आझमी यांनी भर दिला आहे. समाजवादी पक्षाचे स्टार प्रचारकही मुंबईत दाखल झाले असून प्रचारात सक्रिय झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com