तिजोरी प्रचंड, लढाई तीव्र!

तिजोरी प्रचंड, लढाई तीव्र!

Published on

तिजोरी प्रचंड, लढाई तीव्र!
मुंबई महापालिकेच्या ७४ हजार कोटींच्या अर्थसंकल्‍पावर सर्वांचे लक्ष
विष्णू सोनवणे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः मुंबई महापालिकेच्या यंदाचा अर्थसंकल्प ७४ हजार कोटी रुपयांचा आहे. दरवर्षीच्या अर्थसंकल्पात वाढ होत आहे. पालिकेच्या ठेवी ८० हजार कोटींवर आल्या आहेत. कोट्यवधींचे प्रकल्प मुंबईत राबविले जात आहेत. पालिकेचा हा आर्थिक डोलारा देशातील इतर महापालिकांच्या तुलनेत मोठा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबईला मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच राजकीय पक्षांना मुंबईची भुरळ आहे. मुंबई पालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. श्रीमंत असलेली महापालिका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांची अटीतटीची लढाई सुरू झाली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे आकारमान असलेले ७४,४१७.४१ कोटी रुपयांचे अर्थसंकल्‍प यंदाचे आहे. देशातील इतर महापालिकांच्या तुलनेत मुंबई महापालिकेचे अर्थसंकल्‍प मोठे आहे. या अर्थसंकल्पात दरवर्षी घसघशीत वाढ होत आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प १४ हजार ४७२ कोटी ६६ लाख रुपयांनी वाढला आहे. प्रदूषण, स्वच्छता, पाणी प्रकल्प व सांडपाणी प्रकल्प, पूल, रस्ते, आरोग्य, शिक्षणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचा हा आर्थिक डोलारा पाहता सर्वच राजकीय पक्षांना मुंबई महापालिका ताब्यात असावी, असे वाटू लागले आहे. त्यासाठी या निवडणुकीत अटीतटीची राजकीय स्पर्धा सुरू झाली आहे.
मुंबईचे महत्त्व जागतिक स्तरावर अधोरेखित झाले आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीलाही विशेष महत्त्व आले आहे. देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेकडे पाहिले जाते. देश-विदेशातील पर्यटकांनाही मुंबईबाबत आकर्षण असते. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये मुंबईत तुल्यबळ लढतींकडे मुंबईकरांचे तसेच देशाचे लक्ष लागले आहे.

पालिकेच्या ठेवी घटल्या
पालिकेचे आर्थिक स्रोत आटले असून रस्ते तसेच विविध प्रकल्प यांसारख्या विकासकामांसाठी मुदत ठेवी मोडल्या जात आहेत. गेल्‍या सहा वर्षांपूर्वी ९२ हजार कोटी रुपये इतक्या ठेवी होत्या. त्या आता ८० हजार कोटींवर आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या या हक्काच्या कोट्यवधीच्या गंगाजळीला धोका निर्माण झाला आहे.

अर्थसंकल्‍पात केलेली तरतूद
रस्ते आणि वाहतुकीसाठी १६,४३४.०४ कोटी
कोस्टल रोड उत्तरसाठी ४,३०० कोटी
गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी १,९५८.७३ कोटी
घनकचरा व्यवस्थापन ६,०६४.९८ कोटी
आरोग्य विभागासाठी ७,३८० कोटी
पर्जन्य जलवाहिन्यांसाठी ३,०३९.२५ कोटी
शिक्षण विभाग : ३,२४१ कोटी रुपये
पूल विभाग : ८,३६९ कोटी रुपये

देशातील मुख्य महानगरांचे अर्थसंकल्प
मुंबई महापालिका - ७४,४२७.४१ कोटी रुपये
बंगळूर महापालिका - १९,९३०.६४ कोटी रुपये
हैदराबाद महापालिका - ८,४४० कोटी रुपये
दिल्ली महापालिका - १७,००० कोटी रुपये
कोलकाता महापालिका - ५,६३९ कोटी रुपये
अहमदाबाद महापालिका - १५,५०२ कोटी रुपये

महत्त्वाच्या महापालिकांचे प्रभाग
मुंबई - २२७
बंगळूर - २४३
हैदराबाद - ३००
दिल्ली - २५०
कोलकाता - १४४
अहमदाबाद - ४८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com