दहा प्रभागात प्रतिष्ठेची लढत
दहा प्रभागांत प्रतिष्ठेची लढत
माजी आमदार, माजी महापौर, दिग्गज राजकीय घराण्यांचे उत्तराधिकारी आमनेसामने
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, यंदाची लढत केवळ सत्तेसाठी नाही तर अस्तित्वासाठी आणि प्रतिष्ठेसाठी होत असल्याचे चित्र आहे. मुंबईतील दहा अशा जागा आहेत, जिथे माजी आमदार, माजी महापौर आणि दिग्गज राजकीय नेत्यांचे वारसदार आमनेसामने ठाकले आहेत. या प्रभागांमधील निकालावर अनेक राजकीय कुटुंबांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मुंबई महापालिकेच्या या दहा जागांचे निकाल केवळ नगरसेवक ठरवणार नाहीत, तर मुंबईवर कुणाचे वर्चस्व राहणार आणि कोणत्या नेत्याचा ‘शब्द’ चालणार, हेदेखील स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे या लढतींकडे सर्व मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग १९१ ः महापौर विरुद्ध आमदाराची कन्या
दादरच्या या प्रभागात ठाकरे गटाच्या माजी महापौर विशाखा राऊत आणि शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या प्रीती सरवणकर-गुरव यांच्यात थेट लढत आहे. विशाखा राऊत या ठाकरे कुटुंबाच्या अत्यंत विश्वासू मानल्या जातात, तर प्रीती यांच्या विजयासाठी स्वतः सदा सरवणकर यांनी आपली ताकद पणाला लावली आहे.
प्रभाग १९२ : दादर, माहीममध्ये निकराची लढाई
शिवसेना भवन ज्या प्रभागात येते, तिथे राजकीय समीकरणे बदलली आहेत. महायुतीत ही जागा मनसेला सुटल्याने यशवंत किल्लेदार रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात शिंदे गटाच्या प्रीती पाटणकर आहेत, ज्यांनी ऐनवेळी ठाकरेंची साथ सोडून धनुष्यबाण हाती घेतला आहे. इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार असले, तरी खरी लढत किल्लेदार विरुद्ध पाटणकर अशीच रंगणार आहे.
प्रभाग २०९ : यामिनी जाधवांची प्रतिष्ठा पणाला
भायखळा भागात शिंदे गटाने माजी आमदार यामिनी जाधव यांना मैदानात उतरवून ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. त्यांचे पती यशवंत जाधव यांचा या भागात मोठा दबदबा आहे. त्यांच्यासमोर मनसेच्या हसीना माहीमकर यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. मनसेने येथे मराठी आणि मुस्लिम मतांचे गणित जुळवण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रभाग १९९ : ‘फायर ब्रँड’ नेत्या किशोरी पेडणेकरांची कसोटी
ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर या प्रभाग १९९ मधून मैदानात उतरल्यावर आहेत. त्यांना रोखण्यासाठी शिंदे गटाने रूपाली कुसळे यांना उमेदवारी दिली आहे. दोन शिवसेनांमधील हा सामना मुंबईत सर्वाधिक चर्चेचा ठरला आहे.
प्रभाग २२५ : नार्वेकर विरुद्ध धात्रक
कुलाबा परिसरात भाजपचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने माजी आमदार अशोक धात्रक यांचे पुत्र अजिंक्य धात्रक यांना उतरवले आहे. दोन बड्या राजकीय घराण्यांमधील हा सामना चुरशीचा होणार आहे.
प्रभाग ८७ : ‘मातोश्री’चा गड राखण्याचे आव्हान
हायप्रोफाइल समजल्या जाणाऱ्या वांद्रे येथील या प्रभागात माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पत्नी पूजा महाडेश्वर (ठाकरे गट) रिंगणात आहेत. त्यांना भाजपच्या कृष्ण पारकर यांचे तगडे आव्हान आहे. या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
नेत्यांच्या वारसदारांची अग्निपरीक्षा
मुंबईच्या राजकारणात यंदा घराणेशाहीपेक्षा ‘वारसा’ सिद्ध करण्याची मोठी संधी उमेदवारांकडे आहे. प्रभाग १४० (चेंबूर) येथून काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे यांची मुलगी प्रज्योती हंडोरे मैदानात आहे. त्यांच्यासमोर दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आव्हान आहे. प्रभाग ३४ मधून काँग्रेसचे माजी आमदार असलम शेख यांचा मुलगा हैदर असलम शेख विरुद्ध भाजपचे जॉन टेनिस यांच्यात चुरस आहे. प्रभाग ८९ मधून माजी खासदार विनायक राऊत यांचे पुत्र गितेश राऊत (ठाकरे गट) आपली राजकीय कारकीर्द सुरू करण्यासाठी सज्ज आहेत. प्रभाग १०७ मधून भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या पुन्हा एकदा भाजपच्या तिकिटावर नशीब अजमावत आहेत. त्यांचा सामना वंचितच्या वैशाली सकपाळ यांच्यासोबत होणार आहे. तर प्रभाग ११४ मधून खासदार संजय दिना पाटील यांची कन्या राजूल पाटील (ठाकरे गट) यांच्यासमोर शिंदे गटाच्या सुप्रिया धुरत यांचे आव्हान आहे.
कुर्ल्यात रंगणार महायुती- महाविकास आघाडीत कुस्ती
प्रभाग १६५ मधून काँग्रेसचे अश्रफ आजमी, भाजपचे रूपेश पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे उमेदवार आमनेसामने आहेत. विशेषतः आमदार नवाब मलिक यांचे बंधू अब्दुल रशीद मलिक यांच्या उमेदवारीमुळे ही लढत चौरंगी आणि अटीतटीची झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

