सायनचे प्रतीक्षा नगर समस्यांचे आगार
सायनचे प्रतीक्षानगर समस्यांचे आगर
राजकीय इच्छाशक्तीअभावी रहिवासी हतबल
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : सायन पूर्वेकडील म्हाडाचे सर्वात मोठे संक्रमण शिबिर म्हणून ओळखले जाणारे ‘प्रतीक्षानगर’ आज समस्यांचे आगर बनले आहे. २२५ हून अधिक इमारती, म्हाडाच्या वसाहती आणि खासगी सोसायट्यांचा समावेश असलेल्या या परिसरात नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे येथील रहिवाशांना नरकयातना सोसाव्या लागत असून, निवडणुकीच्या तोंडावर आपली फसवणूक झाल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे.
घाणीचे साम्राज्य
परिसरात अतिक्रमण आणि अवैध पार्किंगमुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे उंदरांचा सुळसुळाट वाढला असून, इमारतींच्या पायाला धोका निर्माण झाला आहे. नाले तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साथीचे आजार बळावत असतानाही सरकारचा ‘आपला दवाखाना’ अद्याप या वसाहतीपर्यंत पोहोचलेला नाही, ही संतापजनक बाब आहे.
प्रदूषण, वाहतूक कोंडीचा विळखा
प्रतीक्षानगरमध्ये धुळीचे साम्राज्य असल्याने श्वसनाचे विकार वाढत आहेत. येथील अरुंद रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी होणाऱ्या अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडी पाचवीलाच पुजलेली आहे. पदपथांवर फेरीवाल्यांनी कब्जा केल्याने ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागते. बेस्टचा मोठा डेपो समोर असूनही बस गाड्यांच्या फेऱ्यांची वेळ निश्चित नाही. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
निवडणुकीपूर्वीची ‘घाई’ ठरली डोकेदुखी
आचारसंहिता लागण्यापूर्वी या परिसरात रस्ते आणि मलनिस्सारणाची कामे घाईघाईत सुरू करण्यात आली. मात्र ही कामे अपूर्ण स्थितीत असल्याने वाहतूक वळवावी लागली आहे. याचा त्रास सर्वसामान्यांना होत आहे. घाईघाईत गॅस पाइपलाइन टाकली खरी, पण गॅसपुरवठा अद्याप सुरू झालेला नाही. केवळ निवडणुकीच्या तोंडावर काम केल्याचा आव आणण्यासाठी हा बनाव केल्याची चर्चा परिसरात आहे.
झोपडपट्ट्यांकडे दुर्लक्ष
प्रतीक्षानगरला लागून असलेल्या पंचशीलनगर, सावित्रीबाई फुले नगर, सिद्धार्थनगर, रेल्वे पटरी नगर इत्यादी झोपडपट्ट्यांतील नागरिक सध्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्रस्त आहेत. या परिसरात ५० टक्क्यांहून अधिक मतदार राहतात. परिसरात कचरा व्यवस्थापनाची कोणतीही यंत्रणा नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून, आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः सोमय्या रुग्णालयाकडे जाणारा नाल्यावरील पूल गेल्या तीन महिन्यांपासून खचलेल्या अवस्थेत असून, तो अत्यंत धोकादायक झाला आहे. दुसरा पर्याय नसल्याने रहिवाशांना याच नादुरुस्त पुलावरून जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे.
रहिवाशांच्या प्रमुख तक्रारी
- म्हाडा इमारतींच्या दुरुस्ती आणि रंगरंगोटीकडे दुर्लक्ष
- अवैध होर्डिंगमुळे संपूर्ण परिसर विद्रूप झाला आहे.
- मुलांना खेळण्यासाठी जागा नाही. असलेली मैदाने देखभालीअभावी दुरवस्थेत
- खराब रस्त्यांमुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे.
- अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे.
निवडणुका आल्या की आश्वासनांचा पाऊस पडतो, पण जमिनीवर परिस्थिती जैसे थे आहे. आम्हाला आता ठोस कृती हवी आहे, केवळ आश्वासने नकोत.
- जगदीश पाटणकर, रहिवासी, प्रतीक्षानगर
प्रतीक्षानगर परिसरामध्ये चरस, गांजा असे अमली पदार्थ घेणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तरुण पिढी बरबाद होते आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- मोहिनी राजपकर, रहिवासी, पंचशीलनगर
या प्रभागात चांगल्या शाळा नाहीत. आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले आहे. मलनिस्सारण वाहिन्या अपुऱ्या
असल्यामुळे सर्व सांडपाणी बरेचदा रस्त्यावर येते. त्यामुळे दुर्गंधीतून मार्ग काढावा लागतो.
- मंगेश बोरकर, रहिवासी, प्रतीक्षानगर
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

