नाराजीमुळे किल्ला अभेद्य ठेवण्याचे भाजपसमोर आव्हान
नाराजीमुळे किल्ला अभेद्य ठेवण्याचे भाजपसमोर आव्हान
मुलुंडमध्ये होणार चुरशीची लढत
जयेश शिरसाट ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः पक्षांतर्गत गटबाजी, उमेदवार निवडीमुळे नाराज निष्ठावंत आणि बंडखोरीमुळे महापालिका लढतीत मुलुंडचा अभेद्य किल्ला राखण्याचे आव्हान भाजपसमोर निर्माण झाले आहे. त्यातच ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडी झाल्याने २०१७च्या तुलनेत यंदाची लढत भाजपसाठी सहज शक्य नाही, अशी चर्चा या मतदारसंघात सुरू झाली आहे.
धारावीतील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन, कचराभूमीसह अन्य प्रमुख प्रश्न, समस्या कायम असताना उमेदवार निवडीमुळे भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. त्यातच मतदारसंघातील सर्व सहा प्रभाग स्वतःकडे ठेवल्याने मित्रपक्ष शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी नाराज आहेत. याच नाराजीतून एका प्रभागात शिंदे सेनेच्या कार्यकर्त्या सुजाता पाठक यांनी बंडखोरी केली आहे.
दुसरीकडे मनसेने तीन तर ठाकरे सेनेने दोन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. शरद पवार गटाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने बंडखोर उमेदवार दिनेश जाधव यांना ठाकरे बंधूंनी समर्थन जाहीर केले आहे. शिंदे गटाची नाराजी आणि ठाकरे बंधूंची आघाडी या पार्श्वभूमीवर येथील मराठी मतांचे ध्रुवीकरण कितपत होते, यावर येथील निकाल अपेक्षित असेल.
माजी खासदार मनोज कोटक यांनी सात हजारांहून अधिक मताधिक्याने जिंकलेल्या प्रभाग क्रमांक १०३मध्ये भाजपने निष्ठावंत, इच्छुक कार्यकर्त्यांना डावलून हेतल गाला हा नवखा चेहरा दिल्याने नाराजी आहे. ७२ वर्षीय प्रकाश गंगाधरे यांना पुन्हा संधी मिळाल्याने प्रभाग क्रमांक १०४मध्येही नाराजीची किनार आहे.
माजी नगरसेवक आणि नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील यांना आरक्षणामुळे प्रभाग क्रमांक १०७ मधून उमेदवारी देण्यात आल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार आणि प्रदेश भाजपचे कोषाध्यक्ष मिहिर कोटेचा यांनी सहा उमेदवारांचा प्रचार आणि निवडणूक रणनीतीची धुरा स्वतःकडे घेतल्याचे दिसते.
ठाकरे बंधूंनी येथील एक प्रभाग राष्ट्रवादीला (शरद पवार) सोडला. तीन प्रभागांमध्ये मनसेचे तर दोन प्रभागांमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार रिंगणात उतरवले. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने प्रभाग क्रमांक १०७ मधून बंडखोरी करणाऱ्या दिनेश जाधव यांना ठाकरे बंधूंच्या आघाडीने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या प्रभागातून रिंगणात उतरलेल्या नील सोमय्या यांच्यासमोरील आव्हाने वाढली आहेत. गेल्या निवडणुकीत ते प्रभाग क्रमांक १०८ मधून निवडून आले होते. आरक्षणामुळे त्यांना यंदा १०७ प्रभागातून उमेदवारी देण्यात आली आहे. हा प्रभाग त्यांच्यासाठी नवा आहे.
२०१७च्या निवडणुकीत भाजपने येथील सर्वच सहा प्रभाग जिंकले होते. त्या निकालाचा विचार केल्यास यंदाच्या निवडणुकीत प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातील वातावरणानुसार येथील प्रत्येक प्रभागात ठाकरे बंधूंच्या आघाडीने भाजपसमोर आव्हान उभे केल्याचे चित्र आहे.
प्रमुख समस्या
शहरातील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन येथील मिठागरे, कांदळवनांच्या जागेवर होऊ शकते. मुलुंडमधील नागरिकांनी त्यास प्रखर विरोध केला असला तरी पुनर्वसनाची टांगती तलवार मात्र कायम आहे. दाट लोकवस्तीच्या मुलुंडमध्ये पार्किंगसह अन्य पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. बंद पडलेल्या जकात नाक्याच्या १८ एकर भूखंडावर भव्य पार्किंग तळ उभारावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. याशिवाय बंद पडलेल्या क्षेपणभूमीच्या सुमारे ४२ एकर जागेवर एम्सप्रमाणे रुग्णालय, कला-क्रीडा केंद्र, एसटी आगार, बेस्ट आगार व्हावे, यासाठीही नागरिक आग्रही आहेत.
२०१७चे विजयी उमेदवार
प्रभाग १०३
- मनोज कोटक, भाजप - १४,०६३
- गोपीनाथ संसारे, शिवसेना - ६,४२६
प्रभाग १०४
- प्रकाश गंगाधरे, भाजप - १२,५४६
- उत्तम गीते, राष्ट्रवादी - ५,५५०
प्रभाग १०५
- रजनी केणी, भाजप - ९,८६६
- रसिका तोंडवळकर, शिवसेना - ८,३८५
प्रभाग १०६
- प्रभाकर शिंदे, भाजप - ६,८१८
- अभिजित कदम, शिवसेना ४,८४१
प्रभाग १०७
- समिता कांबळे, भाजप - १०,५०५
- मालती शेट्टी, शिवसेना - ५,५१८
प्रभाग १०८
- नील सोमय्या, भाजप - ९,५८६ विजयी
- मुकेश कारिया, शिवसेना - ५,५१६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

