निवडणुकीचा प्रचार महागला!
निवडणुकीचा प्रचार महागला!
गर्दीसाठी माणसी ८००-१,००० रुपयांचा दर; वेगवेगळ्या समाज घटकांतील महिलांना पसंती; चहा, नाश्ता हवाच
बापू सुळे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबईत निवडणूक प्रचार जोर धरू लागलेला असतानाच आता प्रचार महागल्याचे समोर आले आहे. प्रचार फेरी, कॉर्नर सभा, रोड शो करायचा म्हटलं की गर्दी हवीच. गर्दी नसेल तर फ्लॉप शो होतो. त्यामुळे विभागातील मतदार, कार्यकर्त्यांवर जास्त विसंभून न राहता उमेदवारांनी आता ३०-४० पुरुष-महिला आपल्या बखोटीलाच ठेवण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यांना चहा, नाश्त्याबरोबरच ८००-१,००० रुपये दिवसभराचे मानधन द्यावे लागत आहे. ही हक्काची गर्दी हाताशी असल्याने प्रचार फेरी, रोड शो वेळेत सुरू करणे शक्य असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या मुंबई महापालिकेच्या निवडणूक रिंगणात शिवसेना-भाजप महायुती, शिवसेना-मनसे युती, काँग्रेस-वंचित आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, एमआयएम अशा प्रमुख पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे प्रभागात आपल्याला कसा चांगला प्रतिसाद आहे, प्रचार फेरीला गर्दी होत आहे हे दाखवावे लागत आहे. मात्र लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत उमेदवार जास्त असल्याने कार्यकर्त्यांची वानवा आहे. तसेच अनेक कार्यकर्ते नोकरी-व्यवसाय सोडून प्रचाराला येण्यास कचरत आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवारांकडून मानधन देऊन महिला, ठरावीक कार्यकर्ते गोळा केले जात असल्याचे एका पक्षाच्या प्रचारप्रमुखाने खासगीत सांगितले.
लोकसभा-विधानसभेवेळी ५००-६०० रुपये हजरी दररोज द्यावी लागत होती. मात्र आता उमेदवार जास्त झाल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे त्यांना द्याव्या लागणारे पैसेही वाढले आहेत. प्रचारासाठी पैसे देऊन आणल्या जाणाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या समाज घटकांतील महिलांना जास्त पसंती दिली जात आहे.
चहा-नास्ता हवाच
सकाळची प्रचार फेरी साडेदहाच्या सुमारास सुरू होते. त्यामुळे सुरुवातीला चहा-नास्ता आणि प्रचार फेरी संपल्यानंतर चहाची व्यवस्था करावी लागत आहे. तसेच सायंकाळी चार ते सात या वेळेत प्रचार फेरी आणि त्यानंतर कॉर्नर सभा होतात. त्यामुळे चार वाजताच चहा आणि नाश्ता द्यावा लागत आहे.
आधी पैसे जमा
आठवडाभरापासून उमेदवारांनी आपल्या प्रचारात गर्दी दिसावी म्हणून मानधनावर लोकांना आणले जात आहे. त्यासाठी संबंधित लोकांच्या गटाचा प्रमुख असलेल्या व्यक्तीकडे सकाळीच पैसे द्यावे लागत आहेत. सध्या तरी त्यांना नाराज करून चालणार नसल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
- सकाळी ९.३० ते दुपारी १ पर्यंत प्रचार फेरी
- सायंकाळी ४ ते ७ पर्यंत प्रचार फेरी, कॉर्नर सभा
- सकाळी चहा-नास्ता (वडापाव, पोहे, इडली)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

