मैदानांचा श्वास कोंडतोय!
मैदानांचा श्वास कोंडतोय!
अस्वच्छता, गैरसोयी, शौचालयांचा अभाव, पर्यावरणीय समस्यांच्या विळख्यात
मयूर फडके ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : काँक्रीटच्या जंगलात हरवत चाललेले शहर, उपनगरांतील शेतजमिनी नष्ट होऊन उभी राहिलेली हाउसिंग कॉम्प्लेक्स, टोलेजंग इमारती यामुळे मैदानांचा बळी जाऊ लागला आहे. खेळण्यासाठी समर्पित जागांचा अभाव, मैदानांमधील गैरसोयी, पर्यावरणीय समस्यामुळे या मैदानाचा श्वास कोंडू लागला आहे. मुंबईतील क्रीडा मैदानांचा विचार केल्यास प्रामुख्याने ऐतिहासिक ओव्हल आणि छत्रपती शिवाजी पार्क, सेंट झेवियर या मैदानांची नावे डोळ्यासमोर येतात; परंतु या ऐतिहासिक मैदानांनाही अनेक समस्यांनी ग्रासले आहे.
दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक ओव्हल मैदान हे पालिकेच्या अखत्यारित असले तरीही मैदानाची निगा ही आजही टाटा ट्रस्ट राखते. क्रिकेटशी संबंधित आंतरशालेय, क्लब स्तरावरील विविध स्पर्धा येथे आयोजित होतात. त्यामुळे अन्य मैदानांच्या तुलनेत येथे हिरवळ मोठ्या प्रमाणात आहे. तरीही हे मैदानही प्रदूषणापासून वाचलेले नाही. येथेही धुळीमुळे खेळाडू अथवा फिरायला येणाऱ्याला त्रासाला सामोरे जावे लागते. तर मैदानात फक्त दोनच गेट आहेत. मुंबई विद्यापीठाकडून सुरू होते ते पलीकडे इंप्रेस कोर्ट इमारत किंवा के. सी. महाविद्यालयाच्या दिशेने खुले होते.
मैदानाची रचना जुनी असली तरीही कालांतराने गरजेनुसार बदल आवश्यक आहे. कोणालाही मंत्रालय किंवा चर्चगेट स्थानकाच्या दिशेने जायचे असल्यास याच दोन गेटचा वापर करावा लागतो, अन्यथा बाहेरून वळसा घालून जावे लागते. दोन्ही अंतर खूपच असल्यामुळे येथे मंत्रालय आणि चर्चगेट स्थानकाच्या दिशेने नवे गेट उभारण्याची मागणी काही स्थानिकांनी केली आहे.
शौचालय आणि पाण्याची व्यवस्था नाही
खेळायला येणाऱ्या खेळाडूंना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, येथे शौचालयही नाही. शौचालय नव्याने बांधण्याचे काम सुरू आहे. जुन्या शौचालयात अस्वच्छता, दुर्गंधी होती. जवळपास कोठेही दुसरे शौचालय नसल्यामुळे तेथे जाण्यावाचून पर्याय नसल्याचे काही खेळाडू सांगतात.
महिला खेळांडूचे प्रश्न अधिक गहन
येथे महिला खेळाडूही खेळण्यासाठी येतात. त्यांना शौचालयात अनेकदा दुर्गंधीला सामोरे जावे लागते. त्यामुळे काही महिला खेळाडूंना आरोग्यविषयक समस्या भेडसावतात. अन्य खेळाडू येथे कोपऱ्यात कपडे बदलू शकतात. महिला खेळाडूंसाठी येथे चेंजिंग रूमची सुविधा नाही. त्यामुळे त्यांना घरातून, कार्यालयातून अथवा मळक्या कपड्यांवरच प्रवास करण्याची वेळ येते.
शिवाजी पार्क
दादर येथील शिवाजी पार्क मैदानातील माती वाऱ्यामुळे उडून आजूबाजूच्या परिसरात धूळ प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखणे आणि शुद्ध हवा नागरिकांना मिळणे येथील प्रमुख समस्या आहेत. फेरफटका मारण्यासाठी अनेक जण पार्कात येतात. या पार्कात भिकारी आणि गर्दुल्ल्यांमुळे काही ठिकाणी अस्वच्छता आढळून येते, काही ठिकाणी बसण्यासाठी आसने नाहीत, आम्ही पिढ्यानपिढ्या पार्कात राहतो; परंतु येथील रस्ते चालण्यायोग्य नाहीत, सतत धूळ उडत असल्याने आम्हाला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याचे काही ज्येष्ठ नागरिकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
परळ सेंट झेवियर मैदान
सुमारे १६,००० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले सेंट झेवियर मैदान हे परळ- हिंदमाता- भोईवाडा परिसरातील सर्वात मोठ्या मैदानांपैकी एक आहे. कोविड काळात मैदान कोविड सेंटरसाठी त्यानंतर हिंदमाता परिसरातील पूर समस्या दूर करण्यासाठी प्रस्तावित दोन भूमिगत पाण्याच्या टाक्यांच्या बांधकामासाठी हे मैदान ताब्यात घेण्यात आले आहे. अद्याप हे मैदान सर्वसामान्यांसाठी खुले नाही, मैदानाबाहेर काम पूर्ण झाल्यानंतर मैदान पूर्ववत केले जाईल, असा फलक पालिकेने लावला आहे; परंतु त्याची कालमर्यादा नमूद नसल्याने स्थानिक रहिवाशांसह मुलांना खेळण्यास, फिरण्यास मज्जाव आहे.
उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
क्रॉस, ओव्हल येथे सामने खेळवताना खेळाडूंना कोणत्याही सोयीसुविधा मिळत नसल्याचा दावा करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली होती. या सामन्यासाठी खेळाडूंना तंबू पुरवितात; मात्र पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालये, स्वच्छतागृहांचाही अभाव असून खेळताना खेळाडूंना दुखापत, स्नायूदुखी झाल्यास योग्य आणि वेळेवर उपचार मिळण्यासाठी मैदानात डॉक्टरांची वैद्यकीय सुविधा गरजेची असल्याचा दावाही याचिकेत केला होता; परंतु न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा या प्रश्नी काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट करून याचिका फेटाळून लावली होती.
परळ सेंट झेवियर मैदानात अस्वच्छता, दुर्गंधी पसरली आहे, ती दूर करावी, यासाठी आम्ही स्थानिक सहा वर्षांपासून प्रयत्नशील आहोत.
- सुधीर कांबळी
उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असली तरीही समस्या अद्यापही तशीच आहे. या याचिकेमुळे अनेक खेळाडूंनी आमच्याशी संपर्क साधला असून आम्ही लवकरच यासंदर्भात पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.
- ॲड. राहुल तिवारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

