उमेदवारांचे हटके प्रचार फंडे!
उमेदवारांचे हटके प्रचार फंडे!
कुणाचा क्यूआर कोड; कुणी दिला व्हिजन प्लॅन
मिलिंद तांबे ः सकाळ वृतसेवा
मुंबई, ता. ८ : महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचला असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी पारंपरिक प्रचाराला फाटा देत हायटेक आणि इमोशनल क्लृप्त्या लढवल्या आहेत. कुठे क्यूआर कोडद्वारे कामाचा हिशोब दिला जात आहे, तर कुठे पाच वर्षांचा लेखी रोड मॅप सादर केला जात आहे. मुंबईच्या गल्लीबोळांत सध्या या हटके फंड्यांचीच चर्चा रंगली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रभाग क्रमांक २०६चे उमेदवार सचिन पडवळ यांनी मतदारांसाठी क्यूआर कोड फंडा आणला आहे. मतदारांनी हा कोड स्कॅन केल्यास त्यांना पडवळ यांनी २०१७पासून केलेल्या कामांचा पूर्ण आढावा मिळतो. मी दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत आणि त्याचा पुरावा या कोडमध्ये आहे, असे पडवळ यांनी आवर्जून सांगितले. मुलुंड (पूर्व) मधील भाजप उमेदवार विनोद मिश्रा यांनी निवडणूक आयोगाच्या व्हिजन प्लॅन नियमाचा प्रभावी वापर केला आहे. त्यांनी आपल्या प्रभागाचा पुढील ५ वर्षांचा लेखी रोड मॅप समाजमाध्यमांवर व्हायरल केला आहे. केवळ आश्वासन नाही, तर कामाची पद्धत त्यांनी मतदारांसमोर मांडली आहे. त्यामुळे मतदार आपल्यामागे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. बोरिवली-दहिसर येथील प्रभाग क्रमांक २च्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला आहे. चाळी आणि सोसायट्यांमध्ये जाऊन हळदी-कुंकूसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी महिला मतदारांशी भावनिक नाते जोडले आहे. प्रभाग क्रमांक २ मधील ठाकरे शिवसेनेच्या ३४ वर्षीय उमेदवार धनश्री कोलगे यांनी दहिसरमध्ये तरुणांची मोठी फौज उभी करून हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी, मुंबईतील पाणी तुंबण्याच्या समस्येवर ‘अंडरग्राउंड वॉटर होल्डिंग टँक’चे मॉडेल मांडून तांत्रिक सोल्युशन्स देण्यावर भर दिला आहे.
...
शिक्षक आपल्या दारी
माजी महापौर विशाखा राऊत यांनी दादरमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या गाठीभेटींवर लक्ष केंद्रित केले आहे. सचिन तेंडुलकरच्या शिक्षिका राहिलेल्या विशाखा राऊत शिक्षक म्हणून असलेला आपला आदर आणि घरगुती नाते या जोरावर प्रचार करीत आहेत. ‘शिक्षक आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित त्यांनी आपली प्रचारमोहीम सुरू केली आहे.
...
‘आरे रे आरे’
प्रभाग १२१मधील सीपीआय मार्क्सवादी पक्षाच्या २२ वर्षीय सेजल भोपी यांचा प्रचार पूर्णतः वेगळा आहे. कोणताही झगमगाट न करता, आदिवासी पाड्यांमध्ये पदयात्रा काढून ‘आरे वाचवणे म्हणजेच मुंबई वाचवणे’ या मुद्द्यावर त्या मतदारांना आकर्षित करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी ‘आरे रे आरे’ मोहीम छेडली आहे.
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

