कन्फ्युजन अन् करप्शनची युती
कन्फ्युजन अन् करप्शनची युती!
मुख्यमंत्र्यांकडून ठाकरे बंधूंची खिल्ली
मुंबई, ता. ९ : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती ही ‘कन्फ्युजन’ आणि ‘करप्शन’ यांची युती आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंची खिल्ली उडवली. त्यांनी भ्रष्टाचार केला तर आम्ही कामे केली, असे मुख्यमंत्री फडणवीस चेंबूर येथील प्रचार सभेत म्हणाले.
आपण या युतीला कन्फ्युजन आणि करप्शनची युती असे नाव दिले होते. उद्धव ठाकरेंच्या संपादकांनी राज ठाकरे यांना त्यातील कन्फ्युजन चिकटवले आणि उद्धव ठाकरेंच्या डाेक्यावर करप्शनची टोपी फिट्ट बसवली, असा टाेला मुख्यमंत्र्यांनी दिला. उद्धव-राज हे मुंबईत सभा घेत नाहीत; मात्र त्यांनी नाशिकमध्ये जाऊन सभा घेतली आणि मुंबईवर चर्चा केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती महामार्ग जोडण्यासाठी केबल स्टेड ब्रिज लवकरच पूर्ण होईल. त्याने कुर्ला-वाकोला येथील वाहतूक कोंडी संपेल. शिव-ट्रॉम्बे रोडवरील वाहतूक कोंडी संपवण्यासाठी आम्ही एलिव्हेटेड रोड करीत आहोत. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरे जोडण्यासाठी मुलुंड-गोरेगाव बोगदा तयार करून मुंबईचा चेहरा आम्ही बदलत आहोत. मुंबईच्या भविष्याचा विचार करून गारगाईचे जादा पाणी मुंबईला दिले जाईल. त्याने मुंबईला २५ वर्षे पाणीटंचाई राहणार नाही. सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी मुंबई महापालिका आम्हाला द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
मी मुंबईत जन्मलो नसलाे तरी माझी कर्मभूमी मुंबई आहे. ज्यांना मुंबईची नाडी माहिती होती ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेदेखील पुण्यातच जन्मले होते. त्यामुळे मुंबईकर आणि मुंबईबाहेरचे असा फरक करण्याची ठाकरेंची कृती चुकीची आहे, असे फडणवीस म्हणाले.
---
त्यांनी हिंदुत्वातही घाेटाळा केला!
ठाकरे शिवसेनेने गेली २५ वर्षे फक्त भ्रष्टाचार आणि घोटाळे केले. एवढे घोटाळे त्यांनी केले, की शेवटी बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादातही त्यांनी घोटाळा केला आणि ते कोणाचा हात पकडून गेले हे सगळ्यांना माहिती आहे. ते भ्रष्टाचाराने मुंबईला पोखरणारे आहेत, तर आम्ही काम करणारे आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
----
व्यावसायिक धारावीतच राहणार
धारावीचे पुनर्वसन करताना कोणालाही धारावीबाहेर काढले जाणार नाही. तेथील सर्व झोपडीधारकांना धारावीतच घर देऊ. अपात्रांनाही तेथेच घर मिळेल. व्यावसायिकांनाही तेथेच व्यवसाय करता येईल आणि त्यांना पाच वर्षे करात सवलत दिली जाईल, असेही फडणवीस म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

